आम आदमी पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदी मयूर दौंडकर यांची नियुक्ती

सामान्य कुटुंबातून आलेल्या युवकाला ‘आप’कडून मोठी जबाबदारी

पुणे: लोकचळवळीतून निर्माण झालेल्या आम आदमी पक्षाची यशस्वी राजकीय वाटचाल देशभरात होत आहे. पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (arvind Kejriwal) यांच्या विकासात्मक दृष्टीमुळे पंजाबमध्ये देखील पक्षाला मोठे यश मिळाले. देशभरात आज जातीय आणि सामाजिक ध्रुवीकरणाचे राजकारण सुरु असताना सामान्य जनतेसह युवकांना आम आदमी पक्ष आशेचा किरण दिसत आहे. त्यामुळे पक्षाकडून देखील विस्तार केला जात असून महाराष्ट्रामध्ये नव्याने पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील सामान्य कुटुंबातील असणारे मयूर दौंडकर यांची राज्य युवा आघाडीच्या अध्यक्षपदी पक्षाकडून नियुक्ती करण्यात आली आहे.

आम आदमी पक्षाचे (AAP) राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी डॉ संदीप पाठक, महाराष्ट्र प्रभारी दीपक सिंघला, राज्याचे सह प्रभारी श्री. गोपाल इटालीय यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे मयूर दौंडकर यांची राज्य युवा आघाडीच्या अध्यक्षपदी नेमणूक केल्याची घोषणा केली आहे. दौंडकर हे सध्या खेड -आळंदी विधानसभा युवक अध्यक्ष म्हणून कार्य करत होते. या काळामध्ये त्यांनी तालुक्यासह पुणे जिल्ह्यामध्ये युवकांचे संघटन करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत. युवा संवाद सारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी युवकांना राजकीय व्यासपीठ मिळवून देण्यासाठी काम केलं. जनावरांमध्ये आलेल्या लंपी आजारामध्ये गावातल्या साडेचारशे जनावरांना मोफत लसी देणे, कोरोना काळामध्ये पक्षातर्फे रक्त, प्लाझ्मा मिळवून देण्यापासून ते अगदी रूग्णांना डबे पोहोचवण्यापर्यंतचे सामाजिक काम मयूर दौंडकर यांच्याकडून करण्यात आले.

आम आदमी पक्षाच्या राज्य युवा आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर मयूर दौंडकर म्हणाले, “शाळा तसेच महाविद्यालयीन जीवनापासून अरविंदजी केजरीवाल यांचे विचार, त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे मी प्रभावित झालो. आपल्या लोकांच्या आणि समाजाच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून कोणताच देश विकास करू शकणार नाही. आज देशात आणि राज्यामध्ये अनिश्चिततेच राजकारण सुरु असल्याने युवकांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे. या युवकांनी आता पुढे येऊन राजकरणात सक्रीय होणे गरजेचे आहे. येत्या काळामध्ये पक्षाने दिलेल्या संधीच्या माध्यमातून राज्यभरातील युवकांना ‘आप’मध्ये सक्रीय करण्यासाठी काम करणार आहे.”

माझ्या सारख्या सामान्य कुटुंबातील युवकाला राज्य पातळीवर संघटन बांधणीसाठी जबाबदारी दिल्याबद्दल आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री मा. अरविंद केजरीवाल, राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी डॉ संदीप पाठक, महाराष्ट्र प्रभारी दीपक सिंघला, राज्याचे सह प्रभारी गोपाल इटालियाजी यांचा मी आभारी आहे. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील घराघरामध्ये पक्षाचे विचार पोहचवण्यासाठी तसेच युवकांना संघटीत करण्यासाठी मी मेहनत घेण्याचा विश्वास व्यक्त करतो, असेही मयूर दौंडकर यांनी म्हंटले आहे.