भोंग्यांच्याबाबत जी कारवाई कर्नाटकात शक्य आहे ती महाराष्ट्रात का नाही ? 

बंगरूळ –  कर्नाटकातील मशिदींना विहित डेसिबल (DB)पातळीसह लाऊडस्पीकर वापरण्यास सांगणाऱ्या पोलिस नोटिसा मिळू लागल्या आहेत. काही उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी मशिदींमध्ये लाऊडस्पीकरवर (Loudspeaker) बंदी घालण्याची मागणी सुरू केल्यानंतर पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे.

अशा लाऊडस्पीकरच्या वापरामुळे शेजारी राहणाऱ्या लोकांना त्रास होतो, असे संघटनांचे म्हणणे आहे. सूत्रांनी सांगितले की, एकट्या बेंगळुरूमध्ये सुमारे 250 मशिदींना पोलिसांच्या नोटिसा मिळाल्या आहेत. ते म्हणाले की, यानंतर मशीद प्रशासनाने अशी उपकरणे बसवण्यास सुरुवात केली आहे जेणेकरून आवाजाची पातळी नियंत्रणात राहिलं.

कर्नाटकचे पोलिस महासंचालक (DGP) प्रवीण सूद (pravin sood) यांनी सर्व पोलिस आयुक्त, पोलिस महानिरीक्षक आणि पोलिस अधीक्षकांना धार्मिक स्थळे, पब, नाईट क्लब आणि मेळाव्यांव्यतिरिक्त इतर संस्थांमधील ध्वनिप्रदूषण नियमांच्या उल्लंघनाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. काही संघटनांनी मंगळवारी विविध पोलिस अधिकाऱ्यांना निवेदने सादर करून मशिदींतील लाऊडस्पीकरच्या “गैरवापराची” चौकशी करण्याचे आवाहन केले आहे.

रुग्णालये (hospital), महत्त्वाची शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये अशा शांत भागातही त्यांचा आवाज पोहोचत असल्याचा आरोप संघटना करतात.बेंगळुरूमधील जामा मशिदीचे खतीब-ओ-इमाम मकसूद इम्रान यांनी सांगितले की, पोलिसांनी आवाजाची पातळी परवानगीच्या आत ठेवण्यासाठी नोटिसा पाठवल्यानंतर बेंगळुरूमधील मशिदींनी अशी उपकरणे बसविण्यास सुरुवात केली आहे.