भारत जोडो यात्रा ‘मन की बात’ची यात्रा नाही, जनतेच्या चिंतेची यात्रा : जयराम रमेश

नांदेड – भारत जोडो यात्रा ही राजकीय यात्रा नसून राजकीय फायद्या-तोट्यासाठीही नाही. विरोधकांचे आरोप बिनबुडाचे असून पहिल्या दिवसांपासून विरोधक टीका करत आहेत त्याला काँग्रेस महत्व देत नाही. पदयात्रेला मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस प्रचंड आहे. ही यात्रा ‘मन की बात’ ची यात्रा नसून ‘जनतेच्या चिंते’ची यात्रा आहे, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी सांगितले.

नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे ते पत्रकारांशी संवाद साधत होते. या पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सचिन सावंत, डॉ. राजू वाघमारे आदी उपस्थित होते.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, ही पदयात्रा वेगाने व जनतेच्या मोठ्या प्रतिसादाने पुढे जात आहे. जनतेचा, लोकांचा सहभाग वाढत असून आता ही लोकचळवळ झाली आहे. नांदेड जिल्ह्यात पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. उद्या १० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी नांदेडमध्ये जाहीर सभा आहे. या सभेला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे हे उपस्थित राहणार आहेत तर ११ तारखेला शिवसेनेचे आदित्य ठाकरे सहभागी होत आहेत.या पत्रकार परिषदेत भारत जोडो यात्रेच्या मराठी गीताचे अनावरण करण्यात आले.