मोठी बातमी : चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे भाजप प्रदेशाध्यक्षपदाची तर आशिष शेलार यांच्याकडे मुंबईची जबाबदारी

मुंबई: राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर भाजपने त्यांच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा केली असून चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचेकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी तर आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्याकडे मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपच्या चंद्रकांत पाटील यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर भाजपने ही नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे.

दरम्यान, प्रदेशाध्यक्षपद हे पद कुणाकडे जाणार याची जोरदार चर्चा होती. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी चंद्रशेखर बावनकुळे आणि राम शिंदे यांच्या नावाची चर्चा होती. दोन्ही नेते ओबीसी असल्याने ही उत्सुकता अधिकच शिगेला पोहोचली होती. मात्र, बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत निकटवर्तीय असल्याने त्यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ टाकण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. तसेच बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात फडणवीस यांच्याप्रमाणेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचाही मोठा हात असल्याचं सांगितलं जात आहे.