मुख्यमंत्र्यांच्या दीर्घायुष्यासाठी तिरुपती बालाजीला पायी निघालेल्या कट्टर शिवसैनिकाचा मृत्यू; बीडवर शोककळा

बीड : बीडमधील एका सच्च्या शिवसैनिकाचा काळजाला चटका लावणारा शेवट झाला आहे. त्या शिवसैनिकाचे नाव सुमंत मोहनराव रुईकर. सुमंत ( वय ४८) यांचे शनिवारी (ता.२५) निधन झाले.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी सुमंत रुईकर (Sumant Ruikar) व त्याच्या मित्रासह तिरुपती बालाजीकडे (Tirupati Balaji) पायी प्रवास करत निघाले होते. सुमंत रुईकर यांना तिरुपतीकडे जाताना ताप आल्यानं कर्नाटकातील रायचूर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. प्रकृती खालावल्यानं सुमंत रुईकर यांचं शनिवारी दुपारी निधन झालं. त्यांच्या निधनामुळं बीड शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मध्यंतरी मानेची शस्त्रक्रिया पार पडली. आता उद्धव ठाकरेंची प्रकृती उत्तम असल्याचं राज्य सरकारकडून आणि अनेक मंत्र्यांकडून देखील स्पष्ट करण्यात आलं आहे. मंत्रालयातील काही बैठकांमध्ये उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी देखील होऊ लागले आहेत. मात्र, उद्धव ठाकरेंवर उपचार सुरू असताना त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांकडून सातत्याने प्रार्थना करण्यात येत होत्या. यातच या कट्टर शिवसेना कार्यकर्त्याने उद्धव ठाकरेंच्या दीर्घायुष्यासाठी तिरुपती बालाजीला साकडं घालण्यासाठी बीड ते तिरूपतीपर्यंत पायी जाण्याचा निर्धार केला होता. पण दुर्दैवाने त्यांचा हा निर्धार पूर्ण होऊ शकला नाही.

सुमंत रुईकर आणि त्यांच्या मित्रानं पायी चालत तिरुपतीला 31 डिसेंबरला पोहोचण्याचा संकल्प केला होता. मात्र, ताप आल्यानं रुईकर यांची प्रकृती बिघडली होती. कर्नाटकमधील रायचूर येथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. पण काल दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.

सुमंत रूईकर यांनी यापूर्वीही 2019 मध्ये उध्दव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी बीड ते तिरूपती बालाजी पायी यात्रा पूर्ण केली होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर उध्दव ठाकरेंनी सुमंत रुईकर यांच्या निष्ठेचे कौतुक करत सत्कार केला होता.