बेडूक कितीही फुगला तरी हत्ती बनत नाही; भाजप खासदाराची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका

राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात काल शिंदे गटाने वर्तमानपत्रांमध्ये दिली होती. या जाहिरातीवरुन राजकीय क्षेत्रात बरीच चर्चा झाली. विरोधी नेत्यांनी या जाहिरातीतून भाजप आणि मुख्यमंत्री यांच्यातील तेढ स्पष्टपणे दिसून येते आहे, असे म्हणत टीकास्त्र सोडले. या जाहिरातीतील मजकूर भाजपच्याही चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे भाजप खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM eknath Shinde) यांच्यावर उघडपणे टीका केली आहे.

बेडूक कितीही फुगला तरी हत्ती बनत नाही, अशा शब्दात अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सर्व्हेच्या जाहिरातीवर कडवट प्रतिक्रिया व्यक्त केयली आहे. बोंडे यांनी एक प्रकारे शिंदे यांची बेडकाशीच तुलना केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शिंदे चांगले मुख्यमंत्री आहेत. मात्र त्यांना त्याच्या आजूबाजूचे चुकीचे सल्ले देत आहे, असं सांगतानाच शिंदे यांना ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र वाटायला लागलाय, असा हल्लाबोलही अनिल बोंडे यांनी केला आहे.