भाजपने चंदीगडमध्ये बाजी पलटवत महापौरपद केले काबीज; ‘आप’ला पाहावे लागले पराभवाचे तोंड

चंदीगड – केंद्रशासित प्रदेश चंदीगडमध्ये  बाजी पलटवत भाजपने महापौरपद काबीज केले आहे. भाजपच्या सरबजीत कौर चंदीगडच्या महापौर झाल्या आहेत. सरबजीत कौर यांनी आम आदमी पक्षाच्या (आप) अंजू कात्याल यांचा पराभव करून चंदीगडच्या महापौरपदावर विजय मिळवला आहे. नागरी निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या ‘आप’ने महापौरपदाच्या निवडणुकीत हेराफेरीचा आरोप केला आहे.

चंदीगड नागरी निवडणुकीत भाजपने 12 जागा जिंकल्या होत्या. तर 14 जागा ‘आप’च्या खात्यात आल्या होत्या. काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्यानंतर देवेंद्र सिंग बाबला आणि त्यांच्या नवनिर्वाचित नगरसेवक पत्नी हरप्रीत कौर बबला यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, तर भाजप खासदार किरण खेर यांनाही एक मत देण्याचा अधिकार आहे. अशा प्रकारे भाजपला 14 मते मिळाली होती.

आज सकाळी 11 वाजता सर्व नगरसेवक मतदानासाठी महापालिकेत पोहोचले होते. त्यानंतर महापौरपदाच्या मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. चंदीगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीत 35 मते पडायची होती, मात्र केवळ 28 मते पडली, कारण महापौरपदाच्या निवडणुकीदरम्यान काँग्रेसचे 7 नगरसेवक आणि शिरोमणी अकाली दलाचा 1 नगरसेवक गैरहजर राहिले.

चंदीगड महापालिकेत 35 जागा आहेत. 24 डिसेंबर रोजी नागरी निवडणुका झाल्या ज्यात कोणत्याही पक्षाला बहुमताचा आकडा पार करता आला नाही. मात्र पहिल्यांदाच आलेल्या ‘आप’ने 14 जागा जिंकून चांगलीच हवा निर्माण केली. तर भाजपचे 12 नगरसेवक, काँग्रेसचे 8 आणि अकाली दलाचे 1 नगरसेवक विजयी झाले आहेत.