येत्या दोन दिवसात पावसाची शक्यता, जाणून घ्या तुमच्या भागात कसे असेल हवामान

पुणे – येत्या दोन दिवसात पावसाची शक्यता असल्यानं वाशिम जिल्ह्यातील शेतकरी घाईघाईनं गहू आणि हरभरा काढून थेट कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी नेत आहेत. यामुळं बाजार समितीत गव्हाची आवक वाढून गव्हाला अगदी कमी भाव मिळत आहे.

बुलढाणा जिल्ह्यातल्या काही भागात कालपासून अवकाळी पाउस पडला, त्यामुळे शेतातल्या गहू, हरभरासह कांदा पिकाचं नुकसान होत आहे. नाशिक जिल्ह्यातल्या काही भागात विशेषतः बागलाण तालुक्यात काल अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला. त्यामुळं कांदा आणि मिरची पिकांचं नुकसान झालं.

येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे; काही ठिकाणी विजांसह गारपिटीचाही अंदाज आहे. याच काळात विदर्भ आणि कोकणातही तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.