ज्यांनी क्रॉस वोटिंग केले त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर निर्णय घेऊ – हंडोरे

मुंबई : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांचा पराभव झाला, तर काँग्रेसचे दुसरे उमेदवार भाई जगताप विजयी झाले. या घटनेला काही कालावधी उलटून गेला असला तरीही हंडोरे यांच्या हा पराभव चांगलाच जिव्हारी लागला आहे असं दिसतंय.

भाजपकडे आपला पाचवा उमेदवार प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्यासाठी पुरेशी मते शिल्लक नसताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लाड यांना निवडून आणलं. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत हंडोरे यांनी चेंबूरमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. हंडोरे हे ज्या भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्या संघटनेचं चेंबूरमध्ये चिंतन शिबिर पार पडत आहे. त्यावेळी हंडोरे यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली.

राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसातल्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर हे चिंतन शिबिर होत आहे. विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये मोठा रोष आहे. त्या पार्श्वभूमीवर या चिंतन बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. आपण आणि आपले कार्यकर्ते ज्यांनी क्रॉस वोटिंग केले त्यांच्यावर नाराज आहोत, कारवाई झाली नाही तर निर्णय घेऊ, असा इशाराच हंडोरे यांनी स्वपक्षीयांना दिलाय.