पक्षाची शिस्त मोडून सत्यजीत तांबेंच्या प्रचारात कॉंग्रेस नेत्यांची मुले

नाशिक – दिवसेंदिवस नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची चुरस वाढत असून यातून अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. या निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडाला असून महाविकास आघाडी चांगलाच जोर लावताना दिसत आहे. यातच नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकरीता अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे (satyajeet Tambe) यांना अद्यापही भाजपने आपला पाठिंबा जाहीर केलेला नाही यामुळे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या अडचणी वाढू शकतात.

दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या वतीने शुभांगी पाटील (shubhangi patil )यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांना देखील दिवसेंदिवस पाठींबा वाढत आहे. याशिवाय स्वराज्य संघटनेचे नेते सुरेश पवार (suresh pawar) यांनीही नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे.त्यामुळे ही लढत दुरंगी नव्हे तर तिरंगी झाली असून भाजपच्या भूमिकेवर सर्वांचेच भवितव्य अवलंबून असणार आहे.

अशातच कॉंग्रेसमधून निलंबीत झालेले अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांच्या प्रचारात कॉंग्रेस नेत्यांची मुले सहभाग घेत असल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. नाशिक पदवीधर निवडणूकीतम शिवसेना प्रणित उमेदवार शुंभागी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठींबा दिला आहे. त्यांच्या विजयासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. मात्र दुसरीकडे कॉंग्रेस नेत्यांची मुलं तांबे यांच्या व्यासपीठावर जात असल्याने कॉंग्रेसची नाचक्की होताना दिसत आहे.