2024 च्या निवडणुकीची कॉंग्रेसने सुरु केली तयारी

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी 10 जनपथ येथे झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी कॉंग्रेस पक्षाला काही सल्ले दिले आहेत. निवडणुकीत राजकीय पक्षांना सल्ला देणारी खाजगी संस्था IPAC चे माजी प्रमुख प्रशांत किशोर यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबत काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना सादरीकरण केले, ज्यामध्ये त्यांनी काँग्रेसच्या विजयासाठी त्यांची योजना स्पष्ट केली.

काँग्रेस नेते केसी वेणू गोपाल यांनी सांगितले की, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रशांत किशोर यांच्या सादरीकरणाचा आढावा घेण्यासाठी एक छोटी समिती स्थापन केली आहे. ही समिती आठवडाभरात आपला आढावा अहवाल काँग्रेस हायकमांडला सादर करणार आहे.  प्रशांत किशोर यांनी त्यांच्या सादरीकरणात 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेससाठी 370 ते 400 जागांचे लक्ष्य कॉंग्रेस नेत्यांसमोर ठेवले. जिथे काँग्रेस कमकुवत आहे तिथे काँग्रेसने प्रादेशिक पक्षांशी आघाडी करून निवडणूक लढवायला हवी, असे प्रशांत किशोर म्हणाले.

दरम्यान,  या बैठकीला सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशिवाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, एके अँटनी, अंबिका सोनी, जय राम रमेश, मुकुल वासनिक, दिग्विजय सिंह, अजय माकन आणि केसी वेणू गोपाल हेही उपस्थित होते.