पवार म्हणाले त्या वादग्रस्त पुस्तकासाठी माहिती पुरंदरेंनी दिली; मात्र स्वतः जेम्स लेन म्हणतो… 

पुणे –   ठाण्यात पार पडलेल्या उत्तर सभेत राज ठाकरेंनी (raj Thackeray) राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सडकून टीका केली. राज ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या लिखाणावरुनही मोठा वाद होताना दिसत आहे. एकीकडे राज ठाकरे पुरंदरेंनी घराघरात छत्रपती शिवाजी महाराज सांगत असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा  शरद पवार (Sharad pawar) मात्र त्यांनीच जेम्स लेनला वादग्रस्त पुस्तकासाठी माहिती दिली असा आरोप केला आहे. त्यातच आता स्वत: लेख जेम्स लेनने (James Lane) या वादावर भाष्य केलं आहे.

इंडिया टुडेचे पत्रकार किरण तारे (Kiran tare) यांनी जेम्स लेनची ई-मेलद्वारे मुलाखत घेतली आहे. याच मुलाखतीवारूळ लोकसत्ताने याबाबतचे वृत्त दिले आहे. जेम्स लेन यांनी १६ एप्रिलला इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत २००३ मध्ये प्रकाशित झालेल्या आपल्या Shivaji: Hindu King in Islamic India पुस्तकासाठी पुरंदरे माहितीचे स्त्रोत नव्हते असा खुलासा केला आहे.

पुस्तकातील वादग्रस्त माहिती तुम्हाला कोणी पुरवली याबद्दल विचारलं असता जेम्स लेन यांनी सांगितलं की, “तुम्ही हा प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारत आहात. कोणीही मला माहिती पुरवली नाही. माझं पुस्तक कथा आणि लोक ते कसं सांगतात; त्या कथा सांगणाऱ्या लोकांच्या मूल्यांबद्दल आपल्याला काय कथा सांगतात याबद्दल होतं. उदाहरणार्थ…काही लोक शिवाजी महाराजांचा संबंध रामदास गुरुंसोबत जोडतात तर काहीजण तुकाराम महाराजांसोबत. यापैकी कोणती माहिती योग्य आहे आणि एक गट ‘अ’ कथानकाला का पसंती देतो आणि दुसरा गट ‘ब’ ला का यात मला रस नाही”.

तुम्हाला मिळालेल्या माहितीचा आधार काय होता? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, जो कोणी माझं पुस्तक नीट वाचेल त्याला मी कोणताही ऐतिहासिक दावा करत नसल्याचं लक्षात येईल. मी शिवाजी महाराजांचा अपमान केला अशी टीका करणाऱ्यांनी नीट वाचलेलं नाही. पुन्हा सांगतो की मी फक्त कथा सांगतो, ऐतिहासिक तथ्य नाही. तुम्ही कधी बाबासाहेब पुरंदरेंसोबत चर्चा केली केली का? आणि केली तर त्यांचा प्रतिसाद कसा होता? असं विचारण्यात आलं असता जेम्स लेन यांनी आपली कधीच एका शब्दानेही त्यांच्याशी चर्चा झाली नसल्याचं सांगितलं.

जेव्हा तुम्हाला त्या टिप्पणीबद्दल खेद वाटला आणि ते परत घेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तुमच्या मनात काय चालले होते? असं विचारलं असता ते म्हणाले की, मी माझे युक्तिवाद करताना अधिक सावधगिरी बाळगली नाही आणि त्याचा परिणाम म्हणून इतरांना त्रास सहन करावा लागला याची खंत होती.

बाबासाहेब पुरंदरे तसंच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रती केलेल्या योगदानाकडे कसं पाहता? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, पुरंदरे हे एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वात प्रख्यात समर्थक होते आणि त्याबद्दल ते बराच काळ आदरणीय होते. 18 व्या आणि 19 व्या शतकातील राजकीय लिखाणावरुन आज त्यांच्यावर टीका केली जात आहे, जेव्हा शिवाजी महाराजांच्या वंशजांना काही ब्राह्मणांनी खरे क्षत्रिय मानण्यास नकार दिला होता. त्यानंतरच मराठा आणि ब्राह्मण इतिहासाच्या लेखनात वाद निर्माण झाला.

जवळपास दीड दशकांनंतरही पुस्तकाबाबतच्या वादग्रस्त बातम्या वाचून तुम्हाला काय वाटतं? अशी विचारणा केली असता ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे महान वीर होते. पण मला खेद वाटतो की त्यांचे चरित्र हा विद्वत्तेचा विषय नसून समकालीन राजकीय वादाचं साधन झालं आहे.