काँग्रेस ही एक विचारधारा आहे, तीला कोणीही संपवू शकत नाही – नाना पटोले

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी विधी, मानवाधिकार व आरटीआय विभागाने सुरु केलेले उपक्रम अत्यंत स्तुत्य आहेत. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी ह्या उपक्रमांची मदतच होईल. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत त्याच प्रकारे शेवटच्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे आणि त्यासाठी विधी, मानवाधिकार व आरटीआय विभाग योग्य ती मदत करेल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी विधी, मानवाधिकार व आरटीआय विभागाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला या विभागाचे अध्यक्ष ऍड. रवी जाधव, निवृत्त न्यायाधिश अभय ठिपसे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व विधी विभागाचे प्रभारी विपुल माहेश्वरी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी आशिष दुवा, प्रदेश सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, दिपक तलवार, अंनिसचे अविनाश पाटील उपस्थित होते.

यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस ही एक विचारधारा आहे, तीला कोणीही संपवू शकत नाही. देश आज एक मोठ्या संकटाचा सामना करत असून देशावरचे हे संकट दूर करण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागणार आहेत. आपल्याला स्वातंत्र्य भिकेत मिळालेले नाही तर मोठ्या संघर्षाने मिळालेले आहे. आज हे स्वातंत्र्य, लोकशाही, संविधान धोक्यात असून ते वाचवण्यासाठी आपल्या सर्वांना संघर्ष करावा लागणार आहे.

प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यावेळी म्हणाले की, आरएसएसच्या विचारसरणीने देशात समाज विभाजनाचे काम केले आणि आता मानसिक विभाजन केले आहे. मुंबईच्या तेजपाल हॉलमध्ये ७६ विद्वानांनी एकत्र येऊन ज्यांच्या साम्राज्यावरचा सुर्य मावळत नव्हता त्यांना देश सोडून जाण्यास भाग पाडले. आज पुन्हा एकदा याच मुंबईत विधिज्ज्ञ एकत्र आलेले आहेत. आता एक नवा इतिहास लिहायची आपल्यावर वेळ आलेली आहे. २०१४ पासून देशात चुकीचा इतिहास मांडला जात आहे, सोशल मीडियावर अपप्रचार केला जात आहे हा अपप्रचार व चुकीची माहिती खोडून काढण्याचे काम आपल्याला करावयाचे आहे.