विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे व भाई जगताप यांना उमेदवारी

मुंबई – राज्यसभेनंतर 20 जून रोजी राज्यातील 10 विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणुक होत आहे. यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. नुकतंच भाजपने आपल्या 5 उमेदवारांची नावे जाहीर केली, त्यानंतर आता काँग्रेसनेही आपल्या दोन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

काँग्रेसने दोन्ही जागांवर मुंबईकरांना संधी दिली आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. संख्याबळानुसार  काँग्रेसचा एक उमेदवार सहज विजयी होणार आहे. तर, दुसऱ्या जागेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससह इतरांची मदत काँग्रेसला घ्यावी लागणार आहे.

दरम्यान,  चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) हे भीमशक्ती संघटनेचे नेते आहेत. त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतर त्यांना विधान परिषदेलाही डावलण्यात आलं होतं. आता त्यांना विधान परिषदेची संधी मिळाली आहे.

दुसरीकडे भाई जगताप (Bhai Jagtap) हे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. काँग्रेसचा आक्रमक चेहरा म्हणून ते ओळखले जातात. आगामी महापालिका निवडणुकीआधी भाई जगताप यांना बळ देण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केला आहे. काँग्रेसनं त्यांना पुन्हा विधान परिषदेवर संधी देऊन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर खेळी खेळल्याचं मानलं जात आहे.