अमोल मिटकरी हा राष्ट्रवादीच्या तमाशाच्या फडावरचा नाचा आहे; सदाभाऊ खोत यांचे वादग्रस्त वक्तव्य 

सांगली – माजी मंत्री सदाभाऊ खोत (Former Minister Sadabhau Khot) यांनी सांगलीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार अमोल मिटकरींच्या (Amol Mitkari) आक्षेपार्ह भाषणाविषयी पत्रकारांनी सदाभाऊ खोत यांना प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना सदाभाऊ खोत यांनी  शिवराळ भाषा वापरली. त्यांनी मिटकरी यांची तुलना तमाशाच्या फडावरच्या नाच्यासोबत केली.

मिटकरी यांच्यावर टीका करताना नेते सदाभाऊ खोत यांची जीभ चांगलीच घसरली. अमोल मिटकरी हा राष्ट्रवादीच्या तमाशाच्या फडावरचा नाचा आहे, असं आक्षेपार्ह वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलं. तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जातीयवादाला खतपाणी घातल्याचा आरोप त्यांनी केला. सदाभाऊ खोत यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावरुन मोठा वाद होण्याची शक्यता आहे.

सदाभाऊ खोत म्हणाले, अमोल मिटकरी हा राष्ट्रवादीच्या तमाशाच्या फडावरचा नाचा आहे. राष्ट्रवादीच्या (NCP ) नाच्याला फार गांभीर्याने घ्यावं, असं मला वाटत नाही. राष्ट्रवादी या पक्षाची संस्कृती आहे, जातीभेद वाढवा, जातीजातीत तणाव निर्माण करा. वेगवेगळ्या समाजामध्ये दुही निर्माण करुन त्यांना फोडा, झोडा ही राष्ट्रवादीची निती जुनी आहे.