पडळकरांवर राज्याबाहेर देखील गुन्हे, गृहराज्यमंत्र्यांनी पाढाच वाचला !

मुंबई : आपल्यावर फक्त राजकीय गुन्हे दाखल आहते. लोकांसाठी काम करताना हे गुन्हे दाखल करण्यात आले होते असा कांगावा करणाऱ्या भाजप सदस्य गोपीचंद पडळकर यांची गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत पोलखोल केली. गोपीचंद पडळकर यांच्या वर मारामारी, सरकारी नोकरावर हल्ला, दरोडा, ॲट्रॉसिटी, असे गंभीर गुन्हे दाखल असून त्याची यादीच गृहराज्यमंत्र्यांनी वाचून दाखवली.

2009 पासून त्यांच्यावर एकूण बत्तीस गुन्हे दाखल असल्याचे सांगत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पडळकर यांना चांगलाच दणका दिलाय. विधान परिषदेत 260 अन्वये कायदा आणि सुव्यवस्थेवर गेली तीन दिवस चर्चा झाली. विरोधकांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर बोट ठेवत सरकारवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला त्याला गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्याचबरोबर सभागृहात आपल्यावर केवळ राजकीय गुन्हे दाखल असल्याचे सांगत सभागृहाची दिशाभूल करत असलेल्या पडळकर यांनाही गृहराज्यमंत्र्यांनी चांगलेच उघडे पाडले आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर केवळ राज्यातच गुन्हे दाखल नाही तर शेजारच्या कर्नाटक राज्यातही गुन्हा दाखल आहे. हा परराज्यातील गुन्हा असल्यामुळे मला तो ऑन रेकॉर्ड सभागृहातून सांगता येणार नाही, त्यावर भाष्य करणे बरोबर नाही. आम्ही कर्नाटक सरकारकडून जरूर ती माहिती मागून घेऊ. असे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहाला सांगितले