कोरोना काळात विरोधकांनी सरकार पाडण्याचे प्रयत्न केले, मात्र राज्य सरकारने…, शिंदेचा भाजपवर घणाघात

मुंबई : आमदार शशिकांत शिंदे यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावर विधान परिषदेत आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, कोरोना काळात आर्थिक तूट भरून काढणे राज्य सरकारला अशक्य होते. केंद्र सरकारने कोरोना काळात खासदारांचा विकास निधी बंद केला, मात्र महाविकास आघाडी सरकारने आमदारांच्या विकास निधीत वाढ केली. राज्यावर अनेक संकटे आली आहेत. ज्याच्या हाती सत्ता आहे त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करतो. देशाच्या पंतप्रधानांनी गुजरात राज्याचा विकास करण्याकडे लक्ष दिले. अनेक उद्योग मुंबईतून गुजरातला नेण्यात आले, असे म्हणत त्यांनी विरोधी पक्षावर टीका केली.

निधी वाटपात कोणाला झुकत माप दिलं हे दाखवत विरोधक सरकारमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र जितके प्रयत्न कराल तितके हे सरकार भक्कम होईल. कोरोना काळात विरोधकांनी दिल्लीत जाऊन सरकार पाडण्याचे प्रयत्न केले. त्याच काळात राज्य सरकारने महाराष्ट्राच्या जनतेची सेवा केली आणि केवळ आरोग्य सेवा नाही तर सामान्य जनतेच्या पोटाची भूकही भागवली. नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस जनतेकडून येणाऱ्या मागण्यांची पूर्तता राज्य सरकारने केली, असे सांगत त्यांनी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या कार्याचे कौतुक केले.

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा आर्थिक गाडा चालविण्याचा जो प्रयत्न केला आहे त्याचे कौतुक करावेच लागेल. राज्याची महसुलाची तूट भरून काढताना विरोधक टीका करतात पण अशा टीका करण्यापेक्षा तूट भरून कशी काढावी यासाठी सूचना केल्या तर हे फायद्याचे ठरेल, असे ते म्हणाले.
टोलनाका हा विषय केंद्राचा आहे. मा. नितीन गडकरी या विभागाचे मंत्री आहेत. त्यांनी रस्त्यांचे चांगले जाळे राज्यात तयार केले. पण खेड शिवापूर जिथे अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झाले, तिथे तरीदेखील टोल आकारला जात आहे. त्यामुळे या प्रकरणात राज्याने हस्तक्षेप करून खेड शिवापूर येथील टोलनाका संपूर्ण काम पूर्ण होईपर्यंत बंद करण्याचा निर्णय घ्यावा, अशी विनंती त्यांनी केली.

पंचसूत्रीच्या संकल्पनेतून मांडलेल्या अर्थसंकल्पातून अनेक कार्यक्रम, योजना आणि निधी वाटपाचा निर्णय सरकारने घेतला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी संभाजी महाराजांच्या स्मारकाचा निर्णयही सरकारने घेतला. अर्थसंकल्पात तरतूद करताना विधान परिषदेतील सदस्यांच्या कामांनाही प्राधान्य द्यावे, असे म्हणत त्यांनी अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे कौतुक केले. तसेच बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी मंत्री सुनील केदार यांचे अभिनंदन करून या शर्यतींमधून राज्याच्या उत्पन्न वाढीस सहाय्य होईल, अशी आशा देखील शिंदे यांनी व्यक्त केली.