देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हावे समृद्धीचे लोकार्पण करा; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी

नागपूर : देवेंद्र फडणवीस (Devendraa Fadnavis) यांच्या सरकारचा मेगा प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Highway)निर्मितीचे श्रेय महाविकास आघाडी घेण्याच्या प्रयत्नात आहे. हा महामार्ग अद्याप पूर्णत्वास आलेला नसताना, महामार्गाच्या लोकार्पणाचा घाट घातला जात आहे. अशात समृद्धी महामार्गाचे लोकार्पण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करावे अशी मागणी राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

समृद्धी महामार्गाची संपूर्ण संकल्पना आणि अंमलबजावणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी शेकडो बैठका घेतल्या. प्रत्यक्ष निर्माण स्थळावरचे दौरे केले आणि वेळेत भूसंपादन केले. आता श्रेयवादाची स्पर्धा प्रारंभ झाली असून कोणी कितीही श्रेय घेतले तरी हा प्रकल्प पूर्ण करणाऱ्याचे नाव महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेला माहिती असल्याचे आ. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule)म्हणाले.

महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर श्रेय घेण्यासाठी धावपळ सुरु झाली. फडणवीस सरकारच्या काळात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही मंत्री म्हणून काम केले आहे. परंतु समृद्धी महामार्गाचे एकूणएक काम आणि व्हिजन देवेंद्र फडणवीस यांचे होते. समृद्धी महामार्ग करावा हे पहिल्यांदा त्यांनाच सुचल्याचे आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.