‘कॉन्ट्रोवर्सी क्वीन’ आहे दीपिका; पण जेव्हाही झालाय विवाद, सिनेमांनी कमावलाय बक्कळ पैसा!

जानेवारी २०२३ मध्ये बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याचा ‘पठाण’ हा सिनेमा प्रदर्शित होतोय. नुकतेच या सिनेमातील ‘बेशरम रंग’ हे गाणे प्रदर्शित झाले असून या गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ही अतिशय बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. अनेकांनी गाण्यातील दीपिकाच्या हॉट लूकला पसंती दर्शवली आहे. तर काहींनी तिच्या लूकवर टीका करत सोशल मीडियावर #BoycottPathaan हॅशटॅग ट्रेंडमध्ये आणला आहे.

भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले (Tushar Bhosale) यांनी तर बेशरम रंग गाण्यातील दीपिकाच्या केशरी रंगाच्या बिकिनीतील दृश्यावर आक्षेप नोंदवला आहे. पठाण सिनेमात भगव्या रंगाची बिकिनी घालणे, म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान असणाऱ्या भगव्याचा अपमान होय, अशी बिनबुडाची टीका भाजपाच्या तुषार भोसले यांनी केली आहे. यानंतर हा वाद जास्तच पेटला आहे.

परंतु दीपिकाचा कोणता सिनेमा वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही तिच्या काही सिनेमांवरून भरपूर वाद झाले आहेत. परंतु विवादामुळे या सिनेमांना कमाईत भरपूर फायदाही झाला आहे. त्याच सिनेमांवर एक नजर टाकूया…

कॉकटेल-
दीपिकाचे चित्रपट कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. ज्यात तिच्या कॉकटेल चित्रपटाचा समावेश आहे. या चित्रपटात कोणताही वाद झाला नसला तरी दीपिकाने तिच्या नैराश्याचा खुलासा केल्याने हा चित्रपट चर्चेत आला होता.

बाजीराव मस्तानी-
संजय लीला भन्साली यांच्या बाजीराव मस्तानी या चित्रपटात दीपिका पादुकोण मस्तानीच्या भूमिकेत होती आणि या पात्रामुळे तिला प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले होते. बाजीराव पेशव्यांच्या घराण्यातील लोकांनीही या चित्रपटावर आक्षेप घेतला होता, परंतु हा चित्रपटही ब्लॉकबस्टर ठरला.

राम लीला-
दीपिका पादुकोणच्या राम लीला या चित्रपटाच्या नावावरूनही वाद झाला होता. यानंतर चित्रपटातील रोमँटिक अँगलबद्दल बरीच चर्चा झाली. परंतु या चित्रपटाने १०० कोटींहून अधिक कमाई केली आणि रणवीर दीपिकाच्या रोमान्सची सुरुवातही येथून झाली.

छपाक-
२०२०मध्ये, दीपिका पादुकोण मेघना गुलजारच्या चित्रपटात लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारताना दिसली होती. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी दीपिका जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी पोहोचली होती आणि या वादामुळे दीपिका आणि चित्रपटाला प्रचंड विरोध झाला होता.

पद्मावत-
दीपिका पादुकोणच्या पद्मावत या चित्रपटावरही बराच गदारोळ झाला होता, या चित्रपटाच्या कथेतील प्रत्येक सीनवर लोकांनी खूप गदारोळ केला होता. चित्रपटात दीपिकाचे काही सीन्स चुकीच्या पद्धतीने दाखविल्याबद्दल निषेध करण्यात आला होता. यासोबतच तिच्या घूमर या गाण्यावरूनही वाद झाला होता.