‘अग्निपथ योजने’ची संरक्षण मंत्र्याकडून घोषणा; तरुणांना मिळणार तिन्ही सैन्य दलात सेवेची संधी

नवी दिल्ली :  भरतीसाठी इच्छुक तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने लष्कर भरतीसाठी (Army recruitment) नवीन घोषणा केली आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Union Defense Minister Rajnath Singh) यांनी ‘अग्निपथ’ (‘Agneepath’) योजनेची घोषणा केली आहे. राजनाथ सिंह यांनी मंगळवारी ‘अग्निपथ भरती योजने’ची घोषणा केली. त्यांच्यासोबत तिन्ही दलांचे प्रमुख आणि लष्करी कामकाज विभागाचे अतिरिक्त सचिव लेफ्टनंट जनरल अनिल पुरी (Lieutenant General Anil Puri) हे होते.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, अग्निपथ भरती योजनेंतर्गत तरुणांना ४ वर्षांसाठी सैन्यात भरती केले जाईल. त्यांना अग्निवीर (Agniveer) सैनिक म्हटले जाईल. यासोबतच त्यांना सेवेची मुदत संपल्यावर सर्व्हिस फंड पॅकेजही (service fund package) मिळेल. या योजनेंतर्गत भरती झालेल्या अग्निवीर सैनिकांपैकी 75 टक्के जवानांना 4 वर्षांनंतर पदमुक्त केले जाईल, तर इतर 25 टक्के अत्यंत प्रतिभावान तरुणांना सैन्य दलाकडून कायम केले जाईल. 17.5 ते 21 वर्षे वयोगटातील तरुण यासाठी अर्ज करू शकतील. त्यांचे प्रशिक्षण 10 आठवडे ते 6 महिन्यांचे असेल. 10/12वीचे विद्यार्थी अर्ज करू शकतील. दहावीनंतर भरती होणाऱ्या तरुणांना लष्कराकडून बारावीचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे (Army Chief General Manoj Pandey) म्हणाले, अग्निपथ योजनेचे उद्दिष्ट लष्कराला भविष्यात सर्व संघर्षाच्या विविध आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम लढाऊ दल बनवणे आहे. या योजनेंतर्गत ‘अग्निवार’ सैनिकांची आयटीआय आणि इतर तांत्रिक संस्थांमार्फत भरती केल्यास सैन्याची तांत्रिक मर्यादा वाढेल.