‘बजरंगबलीसारखा छाती फाडून दाखवू शकत नाही की कोणाला मतदान केले आणि कोणाला नाही’

Mumbai :  राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे (MVA) तीन उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. पण, या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कारण, महाविकास आघाडीची अनेक मते फुटली असल्याचे समोर आले आहे. या निवडणुकीत भाजपने केलेली खेळी यशस्वी झाली असून सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय (BJP’s Dhananjay Mahadik’s victory) झाला आहे. विरोधीपक्ष नेते  देवेंद्र फडणवीस यांनी खेळलेल्या खेळीला यश आले आहे.

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सत्ताधारी आघाडीने सहापैकी तीन जागा जिंकल्या, तर भाजपाला तीन जागा मिळाल्या. भाजपाच्या विजयी उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल, माजी राज्यमंत्री अनिल बोंडे आणि पक्षाचे नेते धनंजय महाडिक यांचा समावेश आहे.राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी आणि शिवसेनेचे संजय राऊत हेही राज्यसभेवर निवडून आले आहेत. शिवसेनेला राज्यसभा निवडणुकीत भाजपाने धूळ चारली आणि शिवसेनेची पुरती नाचक्की झाली.

दरम्यान, काठावर पास झालेल्या खासदार संजय राऊतांनी अपक्ष आमदारांची नावे घेत त्यांच्यावर पराभवाचे खापर फोडले. यानंतर आता  बजरंगबलीसारखा छाती फाडून दाखवू शकत नाही की कोणाला मतदान केले आणि कोणाला नाही. मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार मतदान केले. पण, मी संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांचे काही खाल्ले नाही. त्यामुळे आम्हाला गद्दार म्हणायचा राऊत यांना काहीच अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया अपक्ष आमदार देवेंद्र भुयार ( MLA Devendra Bhuyar ) यांनी मांडली.

पहिले मत मी संजय पवारांना दिले तर दुसऱ्या पसंतीची मते संजय राऊत यांना दिले. आता मी हे काही छाती फाडून दाखवू शकत नाही. पण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेप्रमाणे मी हे मतदान केल्याचेही देवेंद्र भुयार यांनी सांगितले. संजय पवार मागे पडले असेल तर त्यात दोष आमचा नाही. तेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातील नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे संजय राऊत यांनी माझ्यावर आरोप केला असेल तर ते चुकीचे आहे. असं ते म्हणाले.