बिग ब्रेकिंग : अमरावती पदवीधरमध्ये धीरज लिंगाडेंचा विजय, तब्बल 30 तास सुरु होती मतमोजणी

अमरावती – नाशिक, नागपूर, कोकण आणि औरंगाबादच्या निवडणुकीचे निकाल काल रात्री उशिरापर्यंत लागले. मात्र, आज दुसरा दिवस उजाडूनही अमरावती पदवीधर मतदारसंघाचा निकाल लागलेला नव्हता. आता 30 तासांनंतर अमरावती पदवीधरचा निकाल जाहीर झालेला आहे. यात  ‘महाविकास आघाडी’चे धीरज लिंगाडे (Dhiraj Lingade ) विजयी झाले आहेत.

अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी काल सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू झाली होती. सुरुवातीपासूनच धीरज लिंगाडे हे आघाडीवर होते. मात्र, संध्याकाळी भाजपचे उमेदवार रणजित पाटील यांनी अवैध बाद मतांवर आक्षेप घेत फेरमतमोजणीची मागणी केली होती. त्यानंतर ही फेरमतमोजणी सुरू झाली होती. तब्बल 30 तास ही फेर मतमोजणी झाली. त्यात लिंगाडे हे विजयी झाले.

भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. भाजपसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची मतमोजणी काल झाली.कोकण विभाग शिक्षक मतदार संघात भाजपाचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले आहेत. नाशिक विभागीय पदवीधर मतदार संघातून अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी आपल्या प्रतिस्पर्धी महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव केला.नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून, महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार सुधाकर अडबाले विजयी झाले आहेत.