जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर बाहेरच्या लोकांनी जमिनी विकत घेतल्या का ? सरकारने दिले ‘हे’ उत्तर

नवी दिल्ली-  जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवून २ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. या निर्णयानंतर आता जम्मू-काश्मीरच्या बाहेरील लोकही येथे जमीन खरेदी करू शकतील, त्यामुळे गुंतवणूक वाढेल, असे सांगण्यात आले. पण आता सरकारने माहिती दिली आहे की कलम 370 रद्द केल्यापासून जम्मू-काश्मीरमध्ये केवळ 7 भूखंड बाहेरच्या लोकांनी विकत घेतले आहेत. आणि हे सर्व भूखंड जम्मू विभागातच येतात. म्हणजेच गेल्या दोन वर्षांत काश्मीरमध्ये बाहेरच्या व्यक्तीने जमीन खरेदी केलेली नाही.

केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी बुधवारी, १५ डिसेंबर रोजी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. प्रश्न विचारला होता,जम्मू-काश्मीरमधील जमीन खरेदी-विक्रीची स्थिती काय आहे? जम्मू-कश्मीरमध्ये आतापर्यंत बाहेरच्या राज्यातून कोणी जमीन खरेदी केली आहे का? आणि जर खरेदी केली असेल तर त्याचे तपशील काय आहेत? याला उत्तर देताना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत सांगितले.जम्मू-काश्मीर सरकारने दिलेल्या माहितीनुसार, कलम 370 रद्द केल्यानंतर, जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशाबाहेरील लोकांनी एकूण सात भूखंड खरेदी केले आहेत आणि हे सर्व भूखंड जम्मू विभागात आहेत.

दरम्यान, कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये गुंतवणूक येईल आणि लोक येथे येऊन व्यवसाय सुरू करतील, असा दावा सरकारने केला होता. कलम 370 हटवल्यानंतर आता काश्मीरमध्ये भूखंड खरेदी करणार अशी जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. सरकारची आश्वासने अडीच वर्षानंतरही प्रत्यक्षात उतरू शकली नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

ऑगस्ट 2019 रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेतील कलम 370 च्या तरतुदी रद्द केल्या. तसेच, राज्य जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागले गेले कलम 370 मुळे जम्मू-काश्मीरबाबत अशी तरतूद करण्यात आली होती की इतर राज्यातील लोक तेथे जमीन खरेदी करू शकत नाहीत. तेथे जन्मलेल्या लोकांनाच मालमत्ता खरेदी करण्याची परवानगी होती.