आरक्षणाच्या वादावर एकच पर्याय असलेली जातनिहाय जनगणना महाराष्ट्रात करा – नाना पटोले

मराठा-ओबीसी समाजातील लोकांना बोलावून चर्चा करा, महाराष्ट्र पेटता ठेवू नका.

Nana Patole On Reservation – राज्यात आज विविध समाज आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. मराठा, धनगर, हलबा, गोवारी, ओबीसी समाज आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला, हे बीज कोणी रोवले? भाजपाने सत्तेत येण्यासाठी २०१४ मध्ये या समाज घटकांना आरक्षणाचे आश्वासन दिले होते मग सत्ता आल्यानंतर आरक्षण देण्यापासून तुम्हाला कोणी थांबवले आहे का? आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांच्या भूमीतच आरक्षणावरून वाद होत आहेत हे भूषणावह नाही. या सर्वांवर एकच पर्याय असून सत्ताधारी पक्षाकडे स्पष्ट बहुमत आहे, सरकारने जातनिहाय जनगणना करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Maharashtra Pradesh Congress Committee President Nana Patole) यांनी केली आहे.

विधानसभेतील चर्चेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, २०१८ मध्ये मोदी सरकारने राज्याचे आरक्षणाचे अधिकार काढून घेतले पण २०१९ मध्ये तत्कालीन फडणवीस सरकारने विधानसभेत मराठा आरक्षणाचे विधेयक आणून ते एकमताने मंजूर करण्यात आले, त्यावेळी गायकवाड आयोग नेमला होता पण सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकले नाही, सुप्रीम कोर्टाने गायकवाड आयोगावरही ताशेरे ओढले. त्यावेळचे सॉलिसिटर जनरल मराठा आरक्षणावर बाजू मांडण्यासंदर्भात काय म्हणाले होते हे सर्वांना माहित आहे. मराठा आरक्षणाविरोधात कोर्टात कोण गेले होते? त्यांच्या पाठीमागे कोण लोक आहेत? हे जनतेला समजले पाहिजे. आरक्षणावरून जाती-जातीत वादाचा वणवा कुणी लावला? भाजपा आता गरिबी ही जात आहे असे म्हणत आहेत, गरिबी जात होऊ शकत नाही यातून गरिब व श्रीमंत अशी दरी निर्माण करु नका.

आरक्षणाच्या प्रश्नावर रस्त्यावर लढाई सुरु आहे. आरक्षणाची चर्चा रस्त्यावर न होता सरकारने ओबीसी व मराठा समाजातील लोकांना बोलावून चर्चा केली पाहिजे. महाराष्ट्र पेटता ठेवणे बरोबर नाही. महाराष्ट्रात शांतता नांदली पाहिजे. राज्यात आज अस्थिरता असल्याने त्याचा परिणाम उद्योगांवर होत आहे, राज्यातील एक-एक उद्योग बाहेर जात आहेत, मोठे उद्योग तर आधीच गुजरातला देऊन टाकले आहेत. राज्यात उद्योग आले नाहीत तर नोकरी, रोजगार कसे मिळतील

आरक्षणाच्या प्रश्नावर मंत्रिमंडळातच एकमत नाही, मंत्रीच वेगवेगळी भूमिका मांडत आहेत. काँग्रेस पक्षाची आरक्षणावर स्पष्ट भूमिका आहे, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक मागास समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे पण कोणी आम्हीच आरक्षण आणतोय असे समजण्याचेही कारण नाही. मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या जरांगे-पाटील यांच्या आंदोलनावर पोलीस लाठीचार्ज केला गेला त्यानंतर आंदोलन चिघळले. मराठा-ओबीसी समाजात कोणी वाद निर्माण केला त्याचे उत्तर दिले पाहिजे. आज दोन समाजात अंतर निर्माण झाले आहे ते कोण भरुन काढणार? असा सवालही नाना पटोले यांनी विचारला.

महत्वाच्या बातम्या-