‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकामुळे दडपला गेलेला इतिहास पुनर्जिवीत करता आला – शरद पोंक्षे

पुणेः- अनेक वर्षे दडपला गेलेला इतिहास ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाच्या माध्यमातून मला पुनर्जिवीत करता आला, याचा एक सिनेनाट्य कलाकार म्हणून मला अभिमान आहे. अनेकदा एखाद्या व्यक्तीरेखेमुळे कलाकार नावरुपास येतो, तर कधी कधी एखादी व्यक्तिरेखा एखाद्या कलाकारामुळे अजरामर होते. माझ्या बाबतीत मी पहिल्या वर्गवारीत मोडतो, हे नम्रपणे नमूद करावेसे वाटते, असे मत ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाच्या माध्यमातून नथुराम गोडसे हे व्यक्तिमत्व घराघरात पोहचविलेले सिने-नाट्य कलाकार शरद पाैंक्षे यांनी व्यक्त केले.

अक्षरधारा बुक गॅलरी, राजहंस प्रकाशन व मांडके हियरिंग सर्व्हिसेस तर्फे आयोजित 595 व्या शब्दोत्सवात आज सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांच्या मी आणि नथुराम या पुस्तकाच्या नवव्या आवृत्तीच्या लोकार्पण सोहळा आणि त्यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन मराठा चेंबर ऑफ कॉमर्स येथे करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी पोंक्षे यांच्याशी संवाद साधला.

यावेळी सुधीर गाडगीळ यांनी विचारलेल्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे देतांना शरद पोंक्षे यांनी त्यांच्या अभिनय कारकीर्दीतील अनेक किस्से आणि प्रसंग सांगून विविध आठवणींना उजाळा दिला.

यावेळी बोलतांना शरद पोंक्षे म्हणाले की, नथुराम गोडसेंचे व्यक्तिमत्व हे धगधगत्या ज्वालामुखी सारखे होते. ते व्यक्तीमत्व आणि गांधीहत्या या घटना अतिशय प्रभावीपणे प्रदीप दळवी यांनी त्यांच्या लेखणीतून उतरवले, तर विनय आपटे सारख्या दिग्दर्शकाने ते व्यक्तिमत्व प्रभावीपणे मांडले.

या नाटकाच्या अवतीभोवती असलेल्या वादविवादां बरोबरच ही भूमिका त्यांच्याकडे कशी आली हे सांगताना शरद पौॆक्षे म्हणाले की, नथुराम गोडसे हे व्यक्तिमत्व साकारणारे साजेसे कलाकार विनय आपटे यांना मिळत नव्हते. अपघातानेच मी या नाटकाच्या तालमीला गेलो आणि मला ही भूमिका मिळाली. तसे पाहिले गेल्यास 1988 सालीच हे नाटक लिहून तयार होते. या भूमिकेसाठी काही समकालीन प्रतिथयश कलाकारांना विचारणा करण्यात आली होती. परंतु, हा विस्तव कोणीही तळहातावर घ्यायला तयार नव्हते आणि योगायोगाने दहा वर्षांनंतर ही भूमिका माझ्याकडे आली. विनय आपटे यांचे दिग्दर्शन या नाटकाला लाभले असल्याने सकाळी 10 तेे 5 तालमीसाठी सभागृह आरक्षित असतांना केवळ एक ते दीड तास प्रत्यक्षात तालीम होत असे. कारण विनय आपटेंच्या दिग्दर्शनाच्या पद्धतीनुसार त्यांनी नथुराम गोडसे आणि तत्कालीन समाज व्यवस्था आमच्यात रुजवली. त्याव्दारे आमच्याकडून त्यांनी नैसर्गिक अभिनय करून घेतला. सिधुताई गोडसे आणि गोपाळराव गोडसे यांच्यासोबत मी तास न् तास गप्पा मारल्या. त्यातून नथुराम गोडसे हे व्यक्तिमत्व वास्तवदर्शी पद्धतीने मी आत्मसात करू शकलो. नाटकाच्या प्रारंभीच्या आणि शुभारंभाच्या प्रयोगांना अनेक राजकीय पक्षांच्या रोषाला आणि विरोधाला, मोर्चांना आम्हाला सामोरे जावे लागले. माझ्या घरी अनेकदा घाणेरड्या, गलिच्छ भाषेत धमकीचे फोन आले. पण या सगळ्या कठीण प्रसंगात केवळ आणि केवळ हिंदू दृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्या खंबीर पाठींब्यामुळेच माझ्या नाटकाचे पुढचे प्रयोग विनाविघ्न पार पडले. या नाटकाला विरोध करणा-यांना तुडवायचेच अशा सूचना बाळासाहेबांनी राज ठाकरे यांना देऊन ठेवल्या होत्या. त्यानुसार ”काही तुडवायचे कार्यक्रम” देखील झाले.

अक्षरधारा बुक गॅलरीच्या रसिका राठवडीकेर यांनी प्रास्ताविक केले. रमेश राठीवडेकर यांनी आभार मानले.