‘केतकीवर अंडी आणि शाई फेक करण्यात आली मात्र या कृत्याची साधी तक्रारही नोंदवून घेण्यात आली नाही’

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांच्याबाबतच्या आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्याप्रकरणी अटकेत असलेली अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale )ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राज्यात २२ ठिकाणी गुन्हे दाखल झाल्यापासून केतकी गेल्या दोन आठवड्यांपासून जेलमध्ये आहे .

कळंबोली पोलीस ठाण्यात ती पोलिसांच्या ताब्यात असताना तिच्यावर अंडी आणि शाई फेक करण्यात आली , यावेळी तिला मारहाणीचाही प्रयत्न झाला , मात्र पोलिसांसमोर घडलेल्या या कृत्याची साधी तक्रारही नोंदवून घेण्यात आली नाही . या सगळ्या तक्रारी घेऊन केतकी चितळेचे वकील थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला पोहचले . या प्रकरणात राज्यपाल आणि केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणीही करण्यात आली आहे . तसेच या प्रकरणाची सीबीआय चौकशीची ( CBI enquiry )मागणीही केतकी चितळेचे वकील योगेश देशपांडे यांनी केली आहे.

तिला कळंबोली पोलीस ठाण्यात झालेल्या मारहाणी प्रकरणी साधी तक्रारही नोंदवण्यात येत नसल्यने या प्रकरणी केंद्रीय मानवाधिकार आयोगाकडेही तक्रार केल्याचे वकील देशपांडे यांनी सांगितले आहे. केतकी चितळेवर तीन दिवसांत आरोपपत्र दाखल करण्यात आले, त्याची कॉपीही अद्याप वकिलांना दिली नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.