काँग्रेस- राष्ट्रवादीच्या लोकांसाठी बाळासाहेबांचा मुलगा आणि नातू मतं मागतो, यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं? 

खेड – योगेश कदमची राजकारणात सुरुवात झाली आहे. त्यानं तुमचं काय घोडं मारलंय? त्यानं तुमचं काय वाईट केलंय? तुम्ही त्याचं राजकारण संपवायला का निघालात. तुम्ही दोन नगरपालिका राष्ट्रवादीच्या घशात घातल्या, याचा साक्षीदार मी आहे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार प्रहार केला.

खेडच्या गोळीबार मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या सभेला ते संबोधित करत होते. काही दिवसांपूर्वी खेडच्या याच मैदानावर उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली होती. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. आता त्याच मैदानावरून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देत चांगलीच धुलाई केली आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांसाठी बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आणि नातू मतं मागतो, यापेक्षा या राज्याचं दुसरं दुर्दैव काय असू शकतं? अशी परिस्थिती तुम्ही याठिकाणी आणली. तुम्ही मुख्यमंत्री झालात. तुम्ही म्हणाले होते, शिवसैनिकाला पालखीत बसवेन. तुम्ही म्हणाले होते, मला मुख्यमंत्री व्हायचं नाही. मग म्हणालात शरद पवारांनी सांगितलं की तुम्हालाच मुख्यमंत्री व्हावं लागेल. पण अशा प्रक्रियेत काहीही लपून राहत नसतं. या प्रक्रियेत असणारे सगळे लोक माझ्या परिचयाचे होते. तुम्हालाच सत्तेचा मोह झाला. तुम्हाला खुर्चीची भुरळ पडली. तुम्ही ते वदवून घेतलंत. आनंद आहे,” असं एकनाथ शिंदे भाषणात म्हणाले.