‘फडणवीसांनी धनंजय मुंडेंवर प्रेम ‘करुणा’ दाखवली पण…’, मुख्यमंत्र्यांनी ठेवलं थेट खटक्यावर बोट

मुंबई : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session) सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार संघर्ष पाहायला मिळतोय. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आहेत. यात माजी मंत्री धनंजय मुंडे हे आघाडीवर असल्याचे दिसत आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही धनंजय मुंडेंना सूचक इशारा दिलाय.

धनंजय मुंडेंना सूचक इशारा देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, परवा धनंजय मुंडे मोठ-मोठ्याने ओरडत होते. चलो गुवाहाटी… चलो गुवाहाटी… अगदी बेंबीच्या देठापासून ओरडत होते. जणू काही ते खूप वर्षापासूनचे शिवसैनिक आहेत. आता त्यांच्याबद्दल काय बोलावं. तुमचा सगळा प्रवास मला माहिती आहे.

आम्हाला सगळं माहितीय. देवेंद्र फडणवीसांनी तुमच्यावर प्रेम, दया, करुणा दाखवली. पण परत परत ती दाखवता येणार नाही, असा टोला शिंदे यांनी धनंजय मुंडेंना लगावलाय. शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर मात्र सभागृहात मोठा हशा पिकला. सत्ताधारी आणि विरोधक दोघेही अक्षरशः पोट धरून हसले.