मला ‘मौनमोहन’ म्हणणाऱ्या, खोटे आरोप करणाऱ्या भाजपची आज संपूर्ण देशासमोर पोलखोल झाली’

नवी दिल्ली : पंजाब निवडणुकीपूर्वी देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंजाबच्या जनतेसाठी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. ते म्हणाले की, पंजाबच्या लोकांनो, भारत एका गंभीर वळणावर उभा आहे. मला पंजाब, उत्तराखंड, गोवा, उत्तर प्रदेश आणि मणिपूर येथील बंधू-भगिनींकडे जाऊन देशातील परिस्थितीवर चर्चा करण्याची खूप इच्छा होती. पण सद्यस्थितीत डॉक्टरांचे मत लक्षात घेऊन मी या व्हिडिओ मेसेजच्या माध्यमातून तुमच्याशी बोलत आहे.

आजची परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. कोरोनाच्या काळात केंद्र सरकारच्या अदूरदर्शी धोरणांमुळे एकीकडे ढासळलेली अर्थव्यवस्था, वाढती महागाई आणि बेरोजगारी यामुळे जनता हैराण आहे, तर दुसरीकडे आज आपले राज्यकर्ते साडे सात वर्षे सरकार चालवूनही आपल्या चुका मान्य करण्याऐवजी लोकांच्या आजच्या अडचणीला देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना जबाबदार धरत आहेत. असे मनमोहन सिंग म्हणाले आहेत.

पंतप्रधानपदाला विशेष प्रतिष्ठा असते आणि इतिहासाला दोष देऊन त्याचे पाप कमी करता येत नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. पंतप्रधान म्हणून दहा वर्षे काम करताना मी स्वत:हून अधिक बोलण्यापेक्षा माझ्या कामाने बोलणे पसंत केले. आम्ही आमच्या राजकीय फायद्यासाठी कधीही देशाचे विभाजन केले नाही, सत्य झाकण्याचा कधीही प्रयत्न केला नाही, देशाची आणि पदाची प्रतिष्ठा कधीही कमी होऊ दिली नाही. कितीही अडचणी असतानाही आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची आणि भारतीयांची मान उंचावली. असं देखील मनमोहन सिंग म्हणाले आहेत.

माझ्यावर ‘मौनमोहन’, कमकुवत आणि भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करणाऱ्या भाजप आणि त्यांच्या बी,सी टीमचा प्रचार आज संपूर्ण देशासमोर उघड झाला आहे आणि २००४ ते २०१४ मध्ये केलेल्या चांगल्या कामाचा देशाला अभिमान आहे, याचे मला समाधान आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या नावाखाली पंजाबचे मुख्यमंत्री सरदार चरणजीत सिंग चन्नी आणि तेथील जनतेची बदनामी करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला होता, ही कोणत्याही दृष्टीने योग्य गोष्ट नाही, तसेच शेतकरी आंदोलनाच्या काळातही पंजाब आणि पंजाबींना बदनाम करण्याचा प्रयत्न झाल्याचे आपण पाहिले. ज्या पंजाबींच्या धैर्याला, शौर्याला, देशभक्तीला आणि बलिदानाला साऱ्या जगाने सलाम केला त्यांच्याबद्दल काय बोलले नाही. पंजाबच्या शूर मातीतून जन्माला आलेला एक सच्चा भारतीय म्हणून मला त्या संपूर्ण घटनेने दुःख झाले. असं देखील मनमोहन सिंग यांनी बोलून दाखवले.