माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी करण्यासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आला – कुचिक

पुणे – शिवसेनेचे (Shiv Sena) उपनेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) यांच्यावर पुण्यात (Pune) बलात्काराचा गुन्हा दाखल. पुण्यातील दौंड येथे राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणीला जीवे मारण्याची धमकी देऊन गर्भपात करायला लावला. तसंच लग्नाचं आमिष दाखवून शारिरिक संबंध ठेवल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

कुचिक यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रघुनाथ कुचिक आणि पीडित तरुणी यांची ओळख ६ नोव्हेंबर २०२० पासून ते १० फेब्रुवारी २०२२ पर्यंत होती. त्या काळात सुरुवातीला ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले.

त्या तरुणीला आरोपी रघुनाथ कुचिक याने लग्नाचे आमिष दाखवून, वेगवेगळ्या ठिकाणी पुणे, गोवा याठिकाणी असलेल्या मोठमोठ्या हॉटेलमध्ये नेवून दुष्कृत्य केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे रघुनाथ कुचिक यांच्यापासून ही तरुणी गरोदर राहिली. हे कळताच रघुनाथ कुचिक यांनी जबरदस्तीनं गर्भपात करुन तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी रघुनाथ बबनराव कुचिक यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, आता याप्रकरणी कुचिक यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी करण्यासाठी राजकीय कटातून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा ब्लॅकमेलिंगचा एक प्रकार आहे आणि कामगार क्षेत्रातील माझे काम आणि माझी अनेक वर्षे सामाजिक आणि राजकीय प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न आहे.

माझा न्यायव्यवस्था आणि पोलिस खात्यावर पूर्ण विश्वास आहे. तपासानंतर सत्य समोर येईल असा मला विश्वास आहे. आज गुन्हा दाखल झाला असल्याने मी जास्त काही बोलणार नाही पण माझी कायदेशीर टीम काम करत असून येत्या दोन दिवसात सविस्तर पुरावे आणि कागदपत्रे देईन असं त्यांनी म्हटले आहे.