महाविकास आघाडीतच निवडणुक लढवा,भाजपशी युती केल्यास कारवाई करू; पटोलेंची तंबी

मुंबई – काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची राज्यात महाविकास आघाडी (MVA) आहे. राज्यातील सर्व प्रकारच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढवण्याचा पक्षाचा निर्णय आहे. परंतु काही ठिकाणी शिंदे गट व भाजपाशी (BJP) युती केल्याच्या तक्रारी येत आहेत, हे पक्षशिस्तीचे उल्लंघन आहे. अशी युती करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला आहे.

राज्यात सध्या कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीसह सहकार क्षेत्रातील सर्व प्रकारच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत स्थानिक पातळीवर वेगळा निर्णय घेऊ नये, यासंदर्भात सर्व जिल्हा व तालुका स्तरावरही सुचना देण्यात आलेल्या आहेत. कोणत्याही प्रकारे पक्षशिस्तीचे उल्लंघन केलेले खपवून घेतले जाणार नाही हे लक्षात ठेवा व काँग्रेस पक्ष तसेच महाविकास आघाडी अबाधित राहिल याकडे लक्ष द्यावे असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी बजावले आहे.