देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवरायाच्या काळात – शरद पवार

मुंबई- देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवरायाच्या काळात लाल महालात झाला. शिवरायांनी लाल महालात शाहिस्तेखानाची बोटं कापली. हिंदवी स्वराज्याचा पाया शिवरायानीच रचला. त्यांनी रयतेचे राज्य निर्माण केलं. लोकमान्यांनी स्वराजाचे आंदोलन केले. केसरी आणि मराठा या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी इंग्रजाना घाम फोडला. टिळक आणि महात्मा गांधींचे योगदान आम्ही विसरु शकत नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले आहे.

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  साहेब उपस्थित होते. पवारांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यांची महती सांगितली. देशात पुणे शहराचे वेगळं महत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा इतिहास पूर्ण जगाला माहित आहे.त्यांचा जन्म याच जिल्ह्यात याच शहरात झाला. त्यांनी येथे आपले बालपण घालवले. हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी शिवाजी महाराज लढले. त्यांनी भोसल्यांचे राज्य नव्हे तर हिंदवी स्वराज्य, रयतेचे राज्य उभे केले. हा गौरवशाही इतिहासाचा भाग आहे. पुढच्या काळात या देशाच्या जवानांनी देशाचे रक्षण करण्यासाठी एक प्रकारचे सर्जिकल स्टाईक केले होते. त्याची चर्चा आता होते. मात्र लाल महालात शायिस्तेखान जेव्हा आला होता तेव्हा या देशातला पहिला सर्जिकल स्ट्राईक हा शिवछत्रपतींच्या काळात झाला ही गोष्ट विसरता येणार नाही. अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येतील. आपण लोकमान्यांच्या नावाने दिला जाणाऱ्या पुरस्कारासाठी आलो आहोत. १८६५ मध्ये लोकमान्य टिळकांचे वडील गंगाधरपंत यांनी रत्नागिरी सोडली आणि ते पुण्यात आले. ते नुसते आगमन नव्हते तर एक प्रकारची ठिणगी होती. त्यानंतर त्या ठिणगीने स्वातंत्र्याच्या मशालीचे रुप घेतले असेही शरद पवार यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे

लोकमान्य टिळक यांनी स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही ही भूमिका जनसामान्य माणसात मांडली. तसेच स्वदेशी वस्तूंवर बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण याच्या माध्यमातून स्वराज्याचं आंदोलन लोकमान्य टिळक यांनी उभे केले. गणेश उत्सव, शिवजयंती यांच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात एक नवीन इतिहास तयार करण्याचं काम केलं. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार साहेब यांनी लोकमान्य टिळक पुरस्कारा दरम्यान भाषणात म्हटले आहे.

शरद पवार यांनी आपल्या भाषणात म्हटले की ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून बाहेर पडायचं असेल तर सामान्य माणसाला जागृत केलं पाहिजे हे लोकमान्यांना माहित होतं. त्यासाठी एक जबरदस्त शस्त्राची आवश्यकता आहे हे त्यांना कळलं. त्यामुळे त्यांनी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रं सुरु केली. केसरीचा अर्थ सिंह असा होता. लोकमान्य टिळकांनी पत्रकारिता करत परकिय आक्रमणांवर प्रहार केले. ते कायम म्हणत होते की पत्रकारितेवर कुणाचाही दबाव असता कामा नये. ही भूमिका त्यांनी कायमच पाळली असेही यावेळी शरद पवार साहेब यांनी स्पष्ट केले आहे

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की  १८८५ मध्ये पुण्यात काँग्रेसचा जन्म झाला. त्या काळात पहिले अधिवेशन इथेच होणार होते. पण प्लेगची साथ आली त्यामुळे मुंबईतल्या ऑगस्ट क्रांती मैदानावर झाले. त्यावेळी मवाळ आणि जहाल असे दोन प्रकारचे नेते होते. जहालांचे प्रतिनिधीत्व लोकमान्य टिळक यांनी केले. स्वराज्य हा माझा हक्क आहे आणि तो घेतल्याशिवाय मी राहणार नाही हा नारा त्यांनी दिला. स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ही त्रिसूत्री आणि त्या माध्यमातून स्वातंत्र्याचे आंदोलन त्यांनी केले असेही शरद पवार साहेब  यांनी यावेळी म्हटले आहे

गणेश उत्सव, शिवजयंती या उत्सवांमध्ये लोकमान्य टिळक यांचे योगदान मोठे होते. त्या कालावधीत दोन युगं होती. एक टिळक युग आणि दुसरे महात्मा गांधींजीचे गांधी युग. या दोघांचेही जे योगदान आहे ते देश कधीही विसरु शकत नाही. देशाच्या नव्या पिढीने या नेत्यांचा आदर्श ठेवला पाहिजे. टिळक पुरस्काराला त्यामुळेच आगळंवेगळं महत्त्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड लोकमान्य टिळक पुरस्कारासाठी केली. या पुरस्कार मिळालेल्यांच्या यादीत इंदिरा गांधी होत्या, खान अब्दुल गफार, बाळासाहेब देवरस होते, अटल बिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंह होते अशी अनेकांची नावे घेता येतील. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही समावेश झाला याचा आनंद आपल्याला सगळ्यांना आहे. त्यामुळे मी सगळ्यांच्या वतीने मी पंतप्रधान नरेंद्र मोदींजी ची  टिळक पुरस्कारासाठी जी निवड झाली त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.