ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नला ‘या’ क्रिकेट संघाचा प्रशिक्षक व्हायचे आहे 

सिडनी  – ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नने इंग्लंड क्रिकेट संघाचा प्रशिक्षक होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. इंग्लंडसाठी तो यापेक्षा चांगली कामगिरी करू शकतो, असे त्याने म्हटले आहे.

इंग्लंडचा प्रशिक्षक होण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचेही वॉर्नने म्हटले आहे. अॅशेसमध्ये ऑस्ट्रेलियाकडून ४-० असा पराभव पत्करावा लागल्यानंतर इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवुड यांची हकालपट्टी करण्यात आली. यानंतर पॉल कॉलिंगवूड यांना इंग्लंड संघाचे अंतरिम मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले. सध्या इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आपल्या संघासाठी कायमस्वरूपी मुख्य प्रशिक्षकाची निवड केलेली नाही.स्काय स्पोर्ट्सच्या क्रिकेट पॉडकास्टवर बोलताना वॉर्नने या पदासाठी आपली इच्छा व्यक्त केली आहे.

वॉर्न म्हणाला, ‘मला हे करायला आवडेल. इंग्लंडचा प्रशिक्षक होण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. मला वाटते की हे काम मी खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. इंग्लंडमध्ये अनेक चांगले खेळाडू आहेत. या संघात खूप खोली आहे. पण त्यांना काही मूलभूत गोष्टी बरोबर मिळायला हव्यात. तुम्ही इतके नो बॉल टाकू शकत नाही, इतके झेल सोडू नयेत. तुमच्याकडे खेळाडू आहेत पण ते फक्त कामगिरी करू शकत नाहीत.

जर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने वॉर्नला या पदासाठी पात्र मानले तर त्याला त्याचा माजी सहकारी जस्टिन लँगरचे आव्हान असेल. ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज आणि अ‍ॅशेस मालिकेनंतर नुकताच कांगारू संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा देणाऱ्या लँगरचे नावही इंग्लंडच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी चर्चेत आहे.