समविचारी पक्षांना एकत्र यायचं असेल तर ही आनंदाची गोष्ट आहे; MIMसोबत आघाडी करण्यास राष्ट्रवादी अनुकूल 

 मुंबई  –  राज्यात नवी सत्तासमीकरणं जुळण्याची चर्चा सुरू झाली असून आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमधून एक मोठी बातमी हाती आली आहे. औरंगाबादमध्ये एमआयएमचे (MIM) खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) जाण्याची तयारी दर्शवली आहे.

भाजपला हरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि एवढंच काय तर शिवसेनेसोबतची जाण्यास आम्ही तयार आहोत, असं वक्तव्य त्यांनी केलंय.एमआयएममुळे प्रत्येक निवडणुकीत मतांचे विभाजन होते आणि भाजपाचा विजय होतो, असा आरोप अनेकदा केला जातो. हा आरोप भविष्यात एमआयएमवर केला जाऊ नये, यासाठी आम्ही महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला आहे, अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत सूचक प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, राजकीय प्रश्नांवर कुणाला एकत्र काम करायचं असेल, समविचारी पक्षांना एकत्र यायचं असेल तर ही आनंदाची गोष्ट आहे. विकास कामासाठी सगळे एकत्र येणार असतील आणि राज्याचे भले होणार असेल तर ही चांगली गोष्ट आहे. कुठल्याही राज्याला ते हवंच आहे. दरम्यान, जलील आणि टोपे यांच्या बैठकीत नेमकं काय झालं याची माहिती माझ्याकडं नाही. संपूर्ण विषय समजून घेतल्यावर त्यावर बोलणं संयुक्तिक ठरेल. असं त्या म्हणाल्या आहेत.