पडद्यामागच्या शिलेदार! हेमंत रासनेंच्या विजयासाठी पत्नी मृणाली दिवसरात्र एक करतायत

पुणे- २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणाऱ्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Kasba Bypoll Election) अवघे बोटावर मोजण्याइतके दिवस उरले आहेत. भाजपाचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांच्यासाठी डझनभर कार्यकर्ते दिवसरात्र झटताना दिसत आहेत.अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत हेमंत रासने यांच्या पत्नी (Hemant Rasne Wife) देखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून मेहनत घेत आहेत.

स्व. मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या रिक्त झालेल्या जागी हेमंत रासने उमेदवार म्हणून या पोटनिवडणुकीत उतरले आहेत. भाजपाने त्यांच्या खांद्यावर ही जबाबदारी टाकल्याने त्यांच्या विजयासाठी रासने कुटुंब दिवस-रात्र एक करत आहेत. हेमंत रासने यांच्या पत्नी मृणाली रासने (Mrunalini Rasne) यादेखील पक्षसंघटनेच्या सूचनेनुसार प्रचारात व्यस्त आहेत. सकाळी ६ वाजल्यापासून रात्री ११ पर्यंत त्या घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत.

“सध्या सकाळी ६ वाजता दिवस सुरू होतो. मतदारसंघातील वेगवेगळी उद्याने, हास्यक्लब, पहाटे फिरायला बाहेर पडणारे नागरिक यांना भेटून सकाळी ९ पर्यंत घरात परतायचे. त्यानंतर आवरून पुन्हा १० वाजता वेगवेगळ्या भागात फिरायचे. दुपारी दोन वाजता जेवण आटोपल्यावर तीन वाजता बाहेर पडल्यावर घरी परतायला रात्रीचे ११ वाजतात. मेळावे, घरोघरी प्रचार, पदयात्रा आदींसाठी आमची टीम सक्रिय असते.’’ मुलगा श्रेयस हा देखील सकाळी ९ वाजल्यापासून रात्री १२ पर्यंत पक्षसंघटनेच्या सूचनेनुसार प्रचाराची जबाबदारी पार पाडतो,” अशी माहिती मृणाली रासने यांनी दिली आहे.