राष्ट्रवादीच्या  महत्वपूर्ण योजनेला शिवसेना माजी आमदाराचा कडाडून विरोध! मोठे जनआंदोलन उभारणार

करमाळा – इंदापुरचे आमदार व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना पुढे करुन इंदापूर व बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेला खुष करण्यासाठी सुप्रिया सुळे यांच्या ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या उजनी धरणातुन पाणी उचलण्यासाठी असलेल्या  लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच  करमाळा तालुक्यातील शिवसेनेचे    माजी आमदार नारायण पाटील यांनी ही या योजनेस आव्हान देण्याची तयारी सुरु केली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना पाटील यांनी सांगितले की करमाळा तालुक्यातील अनेक गावांनी आपल्या घर, शेतजमीन व गावांचा त्याग केल्यानंतर उजनी धरणाची निर्मिती झाली.आज उजनीच्या पाण्यावर पहिला अधिकार हा प्रकल्पग्रस्तांचा असून त्यांच्या भावना वा मत विचारात न घेता आज उजनीच्या पाण्याचे नियोजन केले जात आहे हा गंभीर प्रकार असल्याचा आरोप माजी आमदार नारायण पाटील यांनी केला आहे  तसेच आता प्रत्यक्षात उजनीसाठी त्याग केलेल्या धरणग्रस्तांची व्यथा त्याच्या गावात जाऊन आपण जाणून घेणार असून उजनीच्या भविष्यातील सुस्थितीतील अस्तित्वासाठी आपण शेतकऱ्याला या नियोजनात सहभागी करून घेणार असल्याचे सांगीतले आहे .

या वेळी करमाळ्याचे राष्ट्रवादी पुरस्कृत आमदार संजय  शिंदे यांच्यावर देखील हल्लाबोल  केला असून आमदारांनी करमाळा तालुक्यातील धरणग्रस्तांची फसवणूक केली असून याचे गंभीर परिणाम धरणग्रस्तांणा दीर्घकाळ भोगावे लागणार आहेत असे देखील म्हटले आहे.आमदार संजय शिंदे यांची दुट्टपी भुमिका उजनी पाणी परिषदेच्या माध्यमातून नारायण पाटील जनतेसमोर उघडी करणार असल्याचे बोलले जात आहे.

उजनी पाणी परिषदेच्या माध्यमातून उजनीकाठच्या दहा गावांमध्ये प्रत्यक्ष धरणग्रस्तांचे मत जाणून घेणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली. तर उजनी पाणी परिषदेचा हा नियोजित कार्यक्रम दिनांक २६ मे पासून सुरू होत असून दिनांक ६ जून रोजी या कार्यक्रमाची सांगता होणार आहे.दि २६ मे (वांगी नं ३), दि २७ मे (उमरड), दि २८ मे (कंदर), दि २९ मे (चिखलठाण १), दि ३० मे (शेलगाव-वांगी), ३१ मे (वाशिंबे), १ जून (केतुर २), दि २ जून (टाकळी), दि ३ जून (कोंढारचिंचोली), दि ४ जून (जिंती) अशा   ठिकाणी माजी आमदार नारायण पाटील यांच्या जाहीर सभांचे नियोजन करण्यात आले आहे .या सभा रात्री सात वाजता होणार आहेत. सधर सभेच्या ठिकाणी आसपासच्या गावातील शेतकरी व प्रकल्पग्रस्तांना आमंत्रीत करण्यात येणार आहे.उजनी पाणी परिषदेच्या माध्यमातून या सर्व सभा झाल्या नंतर व प्रत्यक्ष धरणग्रस्तांचे मत विचारात घेऊन दि ६ जून रोजी जेऊर येथे पत्रकारांशी संवाद साधून माजी आमदार नारायण पाटील हे धरणग्रस्तांचे वतीने आपली भूमिका एका पत्रकार परिषदेत मांडणार आहेत.तरी या उजनी परिषदेत धरणग्रस्त व शेतकरी यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन पाटील गटाच्या वतीने तालुकाध्यक्ष प्रा डाॅ संजय चौधरी व  प्रवक्ते सूनील तळेकर यांनी केले आहे.