विद्यापीठांच्या स्वतंत्रपणे चालणाऱ्या कामकाजात मंत्र्यांचा हस्तक्षेप होणार ? अभाविपकडून शिक्षणव्यवस्थेची अंत्ययात्रा

पुणे : दिनांक २८ डिसेंबर या दिवशी महाराष्ट्र विधानसभेमध्ये विद्यापीठ अधिनियम, २०१६ मध्ये नव्याने कलम ९ (अ) समाविष्ट करून प्र-कुलपती पदाची तरतूद करण्यास मान्यता देण्यात आली. या तरतुदीमुळे राज्य सरकारने पाठवलेल्या दोन नावांच्या शिफारसींपैकीच राज्यपालांना कुलगुरू म्हणून एकाची निवड करता येणार आहे. त्यामुळे विद्यापीठांच्या स्वतंत्रपणे चालणाऱ्या कामकाजात आता मंत्र्यांचा हस्तक्षेप असणार आहे.

या नवीन तरतुदींमुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मनात नकळत राजकीय विचार तयार होतील. व त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात पूर्णतः राजकीय हस्तक्षेप सुरू होईल. याचाच विरोध म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आज मृत झालेल्या शैक्षणिक व्यवस्थेच्या अंत्यायात्रेचे आयोजन केले गेले. ही अंत्ययात्रा पुणे स्टेशन येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत राम नाम सत्य हे च्या शोकाकुल स्वरांमध्ये आणण्यात आली.

त्यानंतर शोकसभा म्हणून विद्यार्थी कार्यकर्त्यांनी मृत झालेल्या शिक्षण व्यवस्थेविषयी शोकसंदेश दिले. यानंतर कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन अंतयात्रा ची सांगता केली. यात्रेचा प्रदेश सहमंत्री नागसेन पुंडगे यांनी शांतीमंत्राने समारोप केला. कोरोना महामारी मुळे आधीच डळमळीत झालेल्या शिक्षण व्यवस्थेवर विद्यापीठ कायद्यामुळे दुष्परिणाम होतील व महाराष्ट्रातील विद्यापीठे ही राजकीय पक्षांची दुकाने होतील असे मत महानगर मंत्री शुभंकर बाचल यांनी यावेळी मांडले.