जैवतंत्रज्ञानाच्या भविष्यातील वापराचे नियोजन शेतकरी केंद्रस्थानी ठेवून केले पाहिजे – डॉ प्रमोद चौधरी

पुणे : वातावरणातील बदलाचे गंभीर परिणाम समोर दिसत असताना जैव तंत्रज्ञानाचा शक्य त्या सर्व क्षेत्रात वापर करण्याची आवश्यकता स्पष्ट आहे; मात्र जैव तंत्रज्ञानावर आधारित उत्पादने अथवा सेवा यांच्या निर्मितीसाठी आवश्यक सामग्री शेती क्षेत्रातून येत असल्यामुळे जैवतंत्रज्ञानाच्या भविष्यातील वापराचे नियोजन शेतकरी केंद्रस्थानी ठेवून केले पाहिजे, असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योगपती आणि प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष डॉ प्रमोद चौधरी यांनी आज येथे केले.

जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर पुरस्कार या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल डॉ. चौधरी यांचा युनायटेड वेस्टर्न बिझनेस फोरम या संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. सदर समारंभ वाकड येथील हॉटेल सयाजी येथे आयोजित करण्यात आला होता.

या पुरस्काराचे मानकरी म्हणून डॉ चौधरी यांची २०२० या वर्षासाठी निवड झाली तसेच हा पुरस्कार मिळणारे ते पहिलेच भारतीय आहेत. समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून पर्सिस्टंट सिस्टिम्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ आनंद देशपांडे उपस्थित होते.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ सुहास दिवसे हे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. याशिवाय युनायटेड वेस्टर्न बिझनेस फोरम चे सदस्य मिलिंद महाजन, नवनाथ गायकवाड, मुकेश फरांदे, प्रवीण गाठे आणि प्राज इंडस्ट्रीजचे रवींद्र उटगीकर आणि घनश्याम देशपांडे आदी मान्यवर उपस्थित देखील समारंभास उपस्थित होते.

खनिज तेलाचे झपाट्याने कमी होणारे साठे आणि वातावरणातील बदलांचे मानवी जीवनावर आणि पर्यावरणावर होणारे गंभीर परिणाम लक्षात घेऊन विविध क्षेत्रात जैवतंत्रज्ञानाचा वापर करण्याचा किंवा वाढविण्याचा विचार जोर धरू लागला आहे.

जैव इंधन, जैवतंत्रज्ञानावर आधारित औषधनिर्मिती तसेच रस्ते बांधणी अथवा जलशुद्धीकरण आणि सांडपाण्यावरील प्रक्रिया यासारख्या नागरी सेवांचे नियोजन अशा विविध क्षेत्रात जैवतंत्रज्ञाला वाव असल्याचे डॉ. चौधरी यांनी विषद केले. उद्योजकाला आपल्या कामाबद्दल तीव्र इच्छाशक्ती असलीच पाहिजे परंतु त्याने कायम विद्यार्थ्याच्या भूमिकेत राहून नवे काही शिकले पाहिजे कारण त्यातूनच त्याला नवे मार्ग सापडतील असे डॉ चौधरी म्हणाले.

महापौर मोहोळ यांनी डॉ चौधरी यांचा बोन्साय रोप देऊन प्रतीकात्मक सत्कार केला. युनायटेड वेस्टर्न बिझनेस फॉर्म च्या माहितीपुस्तिकेचे प्रकाशनही मोहोळ यांनी केले. पुणे हे उद्योजकतेचे आगर आहे आणि डॉ चौधरी यांच्यासारख्यांनी मिळविलेले यश शहरातील युवा पिढीला प्रेरणा देईल असे श्री मोहोळ म्हणाले. तसेच डॉ चौधरी यांचा नागरी सत्कार करण्याचा देखील मानस असल्याचे मोहोळ यांनी नमूद केले.

एक उद्योजक म्हणून वाटचाल करत असताना आपली नजर भविष्यात येऊ घातलेल्या बदलांवर कायम असली पाहिजे. यशाचा एक टप्पा गाठल्यावर यापुढचा टप्पा कोणता आणि तो कसा गाठता येईल याचा विचार सुरु केला पाहिजे अन्यथा व्यवसायात साचलेपण येऊन उतरती कळा लागण्याचा धोका असतो असे पर्सिस्टंट सिस्टिम्स चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. आनंद देशपांडे यांनी यावेळी सुचवले.

ते पुढे म्हणाले की उद्योजकाने विशिष्ट प्रगती केल्यावर व्यवसायाच्या जबाबदा-या पात्र सहका-यांकडे सोपवून नवी क्षेत्रे शोधली पाहिजेत. उद्योजकाच्या प्रगतीसाठी आणि अडचणीतून मार्ग दाखविण्यासाठी अनुभवी मार्गदर्शकांची एक फळी उपलब्ध असणे अत्यंत महत्त्वाचे आहे असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

आयआयटी मुंबई च्या माजी विद्यार्थी विभागाचे प्रमुख डॉ. सुहास जोशी यांनी डॉ. प्रमोद चौधरी यांनी संस्थेबरोबर केलेल्या कामांची माहिती दिली आणि प्राज न्यासातर्फे हाती घेण्यात आलेल्या नवीन उपक्रमांची रूपरेखा सांगितली. ते म्हणाले की आयआयटी मुंबई येथे सुरु केलेल्या परिमल आणि प्रमोद चौधरी सेंटर फाँर लर्निंग अँड लर्निंगच्या माध्यमातून आयआयटी मध्ये कार्यरत असणारे तसेच इतर प्राध्यापक आपले विषय शिकवण्याचे कौशल्य आणखी सुधारण्यावर भर देतात आणि या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

डॉ. जोशी पुढे म्हणाले की आयआयटी मुंबई येथे माजी विद्यार्थ्यांसाठी एका कायमस्वरूपी, आजीवन प्रशिक्षण केंद्राची सुरुवात केली जाणार आहे आणि त्यासाठी डॉ चौधरी यांच्याशी चर्चा सुरु आहे. आयआयटी मुंबईचे ६५ हजाराहून अधिक माजी विद्यार्थी आहेत जे जगभरात विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना आयआयटी मुंबईच्या माध्यमातून काही नवीन शिकायचे असल्यास हे केंद्र मदत करेल.

डॉ दिवसे म्हणाले की कृषिक्षेत्र सुदृढ आणि आर्थिकदृष्ट्या लाभदायी होण्यासाठी जैवतंत्रज्ञानाची मोठी मदत होऊ शकेल. यामुळे ग्रामीण भागातून शहरांकडे येणारे लोंढे कमी होतील आणि शहरी सुविधांवरचा ताण कमी होईल असे ते म्हणाले.मिलिंद महाजन यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.

हे वाचलंत का ?