वेगळ्या प्रयोगाला दाद मिळत असल्याचा आनंद – राहुल देशपांडे

पुणे – द अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस यांनी नुकतीच ९५ व्या ऑस्करसाठीची जगभरातील ३०१ चित्रपटांची रिमांइंडर लिस्ट जाहीर केली यांमध्ये ‘मी वसंतराव’ या मराठी चित्रपटाचा समावेश आहे याचा मला मनापासून आनंद आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक राहुल देशपांडे (Rahul Deshpande) यांनी दिली.

यानिमित्ताने आम्ही केलेल्या कामाची दखल जागतिक पातळीवर घेतली जात आहे, ही अभिमानाची बाब आहे. शिवाय मराठी चित्रपट (Marathi movies) व संगीत सृष्टीसाठी देखील हे महत्त्वाचे आहे असे मी मानतो. ‘मी वसंतराव’ हा चित्रपट एक वेगळाच प्रयोग होता. यामध्ये माझे आजोबा डॉ. वसंतराव देशपांडे (Dr. Vasantrao Deshpande) यांचीच कथा मी त्यांचा नातू एक नट म्हणून रसिकांसमोर घेऊन आलो आहे. इतकेच नव्हे तर त्यातील गाणी आणि संगीतदिग्दर्शन हे देखील मी स्वत:च केले असल्याने हा चित्रपट अनेकार्थाने माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. आजच्या या नामांकनाने मला खूप आनंद झाला आहे.