आपली मुलं इतकी मोठी झाली याचा आनंद – सुमित्रा महाजन

- महाराष्ट्र चित्पावन संघाच्या वतीने देण्यात येणारे परशुराम पुरस्कार प्रशांत दामले, गिरीश ओक आणि सुधीर गाडगीळ यांना प्रदान

पुणे : भगवान परशुराम यांनी स्वकर्तृत्वाने भूमी निर्माण केली. त्यांचे पाईक असलेले आजचे सर्व पुरस्कार्थी हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात अभ्यास करून, कष्ट करून स्वकर्तृत्वावर मोठे झाले आहेत. आज त्यांचा सत्कार करताना मला अभिमान वाटतो आहे. आपली मुलं इतकी मोठी झाली याचा अत्यंत आनंद आहे, असे प्रतिपादन लोकसभेच्या माजी अध्यक्षा पद्मभूषण सुमित्रा महाजन यांनी केले. महाराष्ट्र चित्पावन संघाच्या वतीने परशुराम जयंतीचे औचित्य साधत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

प्रसिद्ध नाट्यकर्मी प्रशांत दामले, ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक आणि निवेदक सुधीर गाडगीळ यांचा यावेळी सुमित्रा महाजन यांच्या हस्ते श्री परशुराम पुरस्काराने गौरव करण्यात आला. रुपये ११ हजार रोख, गौरवपत्र, श्री परशुरामाची मूर्ती असे पुरस्काराचे स्वरूप होते. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे सदर कार्यक्रम संपन्न झाला.

महाराष्ट्र चित्पावन संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, कार्याध्यक्ष अजय दाते, कार्यवाह सुप्रिया दामले, कार्यवाह रोहित खरे, माजी कार्याध्यक्ष अशोक वझे, (निवृत्त) एअर मार्शल भूषण गोखले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

माझा जन्म कोकणात झाला आहे हे मी अभिमानाने सासरी म्हणजे इंदौरला सांगते, असे म्हणत महाजन म्हणाल्या, “चित्पावन असल्याने माझा स्वभाव मुळातच भिडस्त आहे. जे योग्य आहे आणि जे मला पटते तेच मी समोर ठेवते किंवा वागते. याच स्वभावाने आजवर मी माझी तत्वे जपली आहेत. अनेकांना माझे वागणे भावले आणि म्हणून त्यांनी मला समर्थन दिले.” मागची पाच वर्षे मला कोणी बोलू दिले नाही. पण समोरच्याचे बोलणेही न चिडता ऐकूण घेणे हा माझ्यासाठी एक अनुभव होता. समोरच्या व्यक्तीचे शांतपणे ऐकूण घेणे मला महाराष्ट्राने शिकवलं असेही महाजन यांनी सांगितले.

एकमेकांच्या हातात हात देत लगड करण्यापेक्षा अंतर राखून केलेला नमस्कार किती महत्त्वाचा आहे याची प्रचिती आपल्याला कोरोना काळात आली, असेही महाजन यांनी नमूद केले.

पुरस्काराला उत्तर देताना सुधीर गाडगीळ मिश्किलपणे म्हणाले, “बोलणं आणि बोलकं करणं हा व्यवसाय करून आता मला ५० वर्षे होताहेत. मी या क्षेत्रात माझ्या पत्नीमुळे आलो आणि आज म्हणून पत्नीचे ऋण व्यक्त करतो. बोलण्याचे पैसे मिळतात का? असा प्रश्न विचारणाऱ्या लोकांना मी आता मागील ५० वर्षे पैसे उत्तर देत आहे. शिवाय आजचा पुरस्कारही मिळाला.”

जेव्हापासून समजायला लागलं तेव्हा भगवान परशुराम यांवरचा एक श्लोक वाचनात आला आणि ते माझे हिरो झाले असे सांगत गिरीश ओक म्हणाले, “एकाच वेळी बुद्धी आणि शक्तीचे अप्रतिम संयुग असं मी परशुरामांचे  वर्णन करतो. आज नाटक आणि इतर व्यासपीठांवर काम करीत असताना भाषा, आवाज यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. माझ्या आई वडिलांनी मला या गोष्टी शिकविल्या त्यांच्यामुळे माझी भाषा सुधारली. त्या दोघांमुळेच आज मी इथवर पोहचू शकलो.”

गेली ४० वर्षे पाठांतर केलेले बोलतोय आज उत्फुर्तपणे बोलायची वेळ आहे असे सांगत प्रशांत दामले म्हणाले, "तुला तुझी लायकी सिद्ध करायची असेल तर, पुण्यात नाव कमवायला लागेल असे मला माझा मित्र लक्ष्मीकांत बेर्डे म्हणाला होता. त्याचा प्रत्यय ‘टूरटूर’ या नाटकादरम्यान आला. मुंबईत हे नाटक चालत नव्हतं मात्र पुण्याने ते उचललं. या नाटकाची इतकी चांगली आणि वेगवान ‘माऊथ पब्लिसिटी’ झाली की पुढे ते मुंबईत उसळलं. आज बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, अण्णाभाऊ साठे नाट्यगृह हे माझ्यासाठी जणू माझ्यासाठी माहेरच आहेत असे दामले यांनी सांगितले .

मनोरंजनासाठी बातम्या बघणारे आपण सर्व लोक लोकसभा टिव्ही कधी पाहणार. मात्र सुमित्रा महाजन यांना पहायला मी लोकसभा टीव्ही पहायचो त्या ज्या पद्धतीने लोकसभेतील द्वाड लोकांना शांत बसवायचा याचा अभिमान वाटतो. लोकसभेतील ती द्वाड लोकं हुशारच असतात असेही दामले म्हणाले. प्रशांत दामले आणि गिरीश ओक यांनी आपल्या पुरस्काराची रक्कम परशुराम भवन येथे उभारण्यात येणाऱ्या विद्यार्थी वसतिगृहाला देणगी स्वरूपात दिली.

यंदापासून नवरात्रीमध्ये समाजातील महिलांच्या कार्याचा विशेष गौरव करण्याच्या हेतूने संघाच्या वतीने श्री योगेश्वरी पुरस्कार सुरु करीत असल्याची घोषणा रोहित खरे यांनी केली.

पुण्यातील मध्यवस्तीत मोनेवाडा येथे तब्बल २१ हजार स्केअर फूट जागेत भव्य परशुराम संकुल साकारत आहे. यापैकी ९५०० स्वेअर फूट बांधून तयार असून लवकरच या ठिकाणी चित्पावन महासंघाचे कार्यालय सुरू होईल. कोकण व बाहेर गावाहून पुण्यात शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, युवकांसाठी इंक्युबेशन सेंटर आणि कुलदैवत असलेल्या आंबेजोगाई येथील योगेश्वरी मंदिराची उभारणी येथे करण्यात येणार आहे, अशी माहिती अशोक वझे यांनी दिली.

सुप्रिया दामले यांनी सूत्रसंचालन केले. रोहित खरे यांनी प्रास्ताविक केले तर अजय दाते यांनी आभार मानले. पुरस्कार वितरणानंतर प्रशांत दामले, सुधीर गाडगीळ, गिरीश ओक आणि गायिका अश्विनी वझे यांसोबत गप्पा-गोष्टी आणि हिंदी व मराठी गाण्यांचा कार्यक्रम देखील संपन्न झाला. पुण्यातील चित्पावन ब्राह्मण समुदायाने कार्यक्रमाला उत्फूर्त प्रतिसाद दिला.