मुंबईने डच्चू दिलेला हार्दिक पंड्या बनू शकतो ‘या’ संघाचा कर्णधार

मुंबई – मुंबई इंडियन्समधून सुटल्यानंतर हार्दिक पंड्या अहमदाबाद या नवीन फ्रँचायझीसाठी खेळताना दिसू शकतो. हार्दिक पांड्याकडेही कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने हार्दिक पांड्याचा उल्लेख केला आहे, ज्यात त्याला प्रथमच आयपीएलमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी सहाय्यक प्रशिक्षकाची भूमिका बजावणारा भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराला अहमदाबाद संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवले जाऊ शकते. मात्र, याबाबत अद्याप काहीही ठरलेले नाही.यावेळी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला रिटेन केले नाही. त्याचा भाऊ कृणाल पांड्यालाही मुंबई इंडियन्स संघातून वगळण्यात आले आहे.

कर्णधार रोहित शर्माशिवाय जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि किरॉन पोलार्ड यांना मुंबई इंडियन्समध्ये कायम ठेवण्यात आले आहे.इतर सर्व खेळाडूंना सोडण्यात आले आहे. मात्र, पाचवेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सच्या संघाला त्यांच्या सोडलेल्या खेळाडूंचा लिलावात संघात समावेश करण्याची संधी असेल. त्यावेळी किती खेळाडूंना संघात परत घेण्याचा प्रयत्न केला जाईल, हे पाहावे लागेल.

अहमदाबादचा संघ सीव्हीसी कॅपिटल्सने विकत घेतला आहे. पाच हजार कोटींहून अधिक रक्कम देऊन संघ खरेदी करण्यात आला आहे. दुबईमध्ये बोली लावल्यानंतर संघाला आयपीएलमध्ये सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, आयपीएलमध्ये अहमदाबाद आणि लखनऊ या दोन्ही नव्या संघांचा समावेश करण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. यावर काम सुरू असून नजीकच्या काळात ते होऊ शकते. मेगा लिलावापूर्वी दोन्ही नवीन संघांना प्रत्येकी 3 खेळाडू कायम ठेवण्याचा अधिकार मिळेल. त्यानंतर इतर सर्व खेळाडूंचा लिलाव पूलमध्ये समावेश केला जाईल.