अयोध्या नगरीमध्ये हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार – शिंदे

Ayodhya : प्रभू श्री रामचंद्र यांचं जन्मस्थळ असलेल्या अयोध्या नगरीमध्ये हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल अयोध्या इथं पत्रकार परिषदेत केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उत्तर प्रदेशाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असून, काल त्यांनी राम जन्मस्थळाचं दर्शन घेतलं. तसंच हनुमान गढी इथं भगवान मारुतीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी जैन मंदिरात जाऊन भगवान महावीरांचं दर्शन घेतलं. तसंच मंदिर बांधकामाची पाहणी केली. यावेळी महाराष्ट्रातील मंत्री, खासदार, आमदार आणि भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारणार असल्याची घोषणा केली.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची याबाबत सकारात्मक भूमिका असल्याचंही शिंदे म्हणाले. महाराष्ट्रातल्या जनतेच्या हितासाठी सरकारनं घेतलेल्या निर्णयांची माहिती त्यांनी इथल्या माध्यमांना दिली. राज्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळं झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी, यासाठी स्वत: पाठपुरावा करीत असल्याचंही त्यांनी सांगितलं.