तुम्ही स्वतःचं नाव बदला आणि शिवाजी भुजबळ करून दाखवा; ‘त्या’ वक्तव्यावर हिंदू महासंघाची टीका

ऐतिहासिक घटनांबाबत वारंवार वादग्रस्त विधानं करणारे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्यावर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी टीका केली आहे. ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी अशी नावं ठेवत नाहीत, अशा शब्दांत भुजबळांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

नाशिकमध्ये मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या ‘समाज दिन’ कार्यक्रमात भुजबळ बोलत होते. ते म्हणाले, “काही लोक म्हणतात तुम्ही इकडे तिकडे गेलात. पण आम्ही कुठेही गेलो तरी शाहू-फुले-आंबेडकरांचा वारसा सोडणार नाही. संभाजी भिडेंचं खरं नाव मनोहर कुलकर्णी आहे. पण लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी खरंतर ब्राह्मण समाजानं वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. पण कुठल्याही ब्राह्मण घरामध्ये कोणीही शिवाजी, संभाजी नाव ठेवत नाहीत. हा माणुस उठूनसुठून कुणावरही टीका करत असतो. त्यामुळं इतिहास मोडणाऱ्यांविरोधात आपल्याला उभं राहावं लागेल.” अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी संभाजी भिडेंवर टीकास्त्र सोडलंय.

दरम्यान, हिंदू महासंघाने छगन भुजबळ यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) यांनी भुजबळांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवताना म्हटले की, छगन भुजबळांनी आज पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडले आहेत. मुळात भुजबळ यांचं हिंदू धर्मातल्या कोणत्याही जातीला बदनाम करण्याचं धोरण का असतं? हा आमचा पहिला प्रश्न आहे. तसेच भुजबळ यांनी त्यांच्या घरात किती शिवाजी आणि संभाजी नावाचे लोक आहेत ते सांगावं.

तुम्ही तुमच्या मुलांची नावं शिवाजी किंवा संभाजी अशी का ठेवली नाही? तुम्ही ओबीसी समाजाचं राजकारण करताना मराठा समाजाला नावं का ठेवता? भुजबळ यांचं हे वक्तव्य मुर्खपणाचं आहे असं आम्ही (हिंदू महासंघ) मानतो. अनेक जातींमध्ये शिवाजी आणि संभाजी अशी नावं असलेली वेगवेगळी माणसं आम्ही दाखवू शकतो. परंतु, येथे व्यक्तीशः उल्लेख करणं योग्य नाही. छगन भुजबळ तुम्हाला अशी नावं सापडली नाहीत तर आम्ही का देऊ. इतरांवर बोलण्याआधी छगन भुजबळ यांनी आधी स्वतःच्या घरातली नावं बदलावी. माझं तर म्हणणं आहे की तुम्ही स्वतःचं नाव बदला आणि शिवाजी भुजबळ करून दाखवा, त्यानंतर आमच्याशी बोला, असे छगन भुजबळ यांना उद्देशून आनंद दवे म्हणाले.