मनसेमुळे हिंदूचे अधिक नुकसान झाले आहे; भोंगा प्रकरणावरून सचिन सावंत यांचा हल्लाबोल 

मुंबई – राज्यात सध्या भोंग्यांचा(Loudspeaker) मुद्दा चर्चेत असून मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray)  यांनी यावरून अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे.सामान्य नागरिक, महिला, विविध पक्ष आणि संघटनांचा राज ठाकरे (Raj Thackeray) यांना पाठींबा मिळत असताना आता जुन्या शिवसैनिकांचा (Shivsainik) देखील राज ठाकरे यांना पाठींबा असल्याचे समोर येत आहे.

एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला कॉंग्रेस नेते सचिन सावंत (Congress leader Sachin Sawant) यांनी या प्रकरणावर भाष्य करत मनसेला (MNS) चांगलेच फैलावर घेतले आहे. ते म्हणाले, मनसेचे अज्ञान किती ? हे स्पष्ट दिसते. मुंबई पोलीस अॅक्ट ३८(१) अन्वये मुंबईत पोलीस लाऊडस्पीकर लावण्यास परवानगी देतात. यात किती व केवढा वेळ वापरण्‍याचा नियम नाही. सर्वोच्च न्यायालयाने रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत मर्यादा घालून डेसिबलवर नियंत्रण ठेवले. याव्यतिरिक्त कोणतेही बंधन नाही.

आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन झाले वा रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत कोणी वापर केला तर तक्रार करता येते. पहाटेची अजान स्वतः मुस्लिम समाजाने बंद केली आहे. पण आता काकड आरतीही बंद झाली. वस्तुस्थिती ही की मनसेमुळे हिंदूचे अधिक नुकसान झाले आहे. मुंबईत एकूण २४०४ मंदिरे व ११४४ मस्जिद आहेत.
कालपर्यंत केवळ २० मंदिराकडे परवानगी आहे. तर ९२२ मस्जिदींकडे परवानगी आहे. ५ मंदिरांचे व १५ मस्जिदींचे अर्ज प्रलंबित आहेत. मनसेचे ऐकलं तर २४०० मंदिरांनाही तसेच चर्च, गुरुद्वारा,बौद्ध मंदिरांना भोंगे वापरता येणार नाहीत. सार्वजनिक उत्सवांना परवानगी मिळणार नाही.

पोलिसांनी घेतलेल्या बैठकीत सर्वधर्मीय प्रतिनिधींनी मनसेला निकराचा विरोध केला आहे. महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर, शिर्डीची काकड आरती बंद झाली. हे पाप कोणाचे ? मनसेचा राजकीय स्वार्थापोटीचा अविचार व भाजपाचा अजेंडा पुरोगामी महाराष्ट्राला घातक आहे.भाजपाशासित राज्यांनी बंदी का घातली नाही ? याचे कारण स्पष्ट आहे. असं सावंत यांनी म्हटले आहे.