राज्य बाजार समिती संघावर महाविकास आघाडीने पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले 

मुंबई – राज्य बाजार समिती संघावर महाविकास आघाडी सरकारने (maha Vikas Aaghadi) पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले असून मविआ नेत्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (mahesh tapase)यांनी अभिनंदन केले आहे. तर दुसरीकडे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील (DilipValasePatil) यांनी कोरोना काळातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी विद्यार्थ्यांवरील दाखल गुन्हे मागे घेणार असल्याचे जाहीर केल्याने महेश तपासे यांनी त्यांचे व गृहविभागाचे आभार मानले आहेत.

राज्य बाजार समिती ही राज्याची शिखर संस्था म्हणून ओळखली जाते. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या या समितीवर राष्ट्रवादीचा वरचष्मा राहिला असून अजूनही जनतेचा राष्ट्रवादीवर आणि पवारसाहेबांच्या कृतीशील विचारांवर विश्वास आहे हे यावरून स्पष्ट दिसत आहे असेही महेश तपासे म्हणाले.

या शिखर संस्थेवर महाविकास आघाडी सरकारने २१ पैकी १७ जागा जिंकत वर्चस्व प्राप्त केले आहे. यामध्ये राष्ट्रवादीने ९ जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. रविवारी २७ मार्च रोजी या संस्थेचा निवडणूक निकाल जाहीर झाला असून भाजपला यामध्ये पाचचा आकडाही गाठता आला नाही असेही महेश तपासे म्हणाले.