बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही – राऊत

मुंबई – पत्राचाळ प्रकरणी (Patra Chaal Land Scams) शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांच्या घरी ईडीची (ED ) टीम दाखल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ‘ईडीने कारवाई केली तरीही शिवसेना सोडणार नाही. मरेन पण शरण जाणार नाही’ असं म्हणत संजय राऊत यांनी ईडीला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

पत्राचाळ प्रकरणामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या रडारवर आले होते. ईडीने संजय राऊत यांची चौकशीही केली होती. पण आज सकाळी अचानक ईडीचे पथक राऊतांच्या घरी दाखल झाले. पत्राचाळ प्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे. संजय राऊतांच्या भांडुपच्या घरी ईडी पथक तळ ठोकून आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी ईडी करावाईच्या पार्श्वभूमीवर तीन ट्विट केले आहेत. त्यांनी आपल्या पहिल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील. तर त्यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमधून ईडी आणि भाजपावर निशाणा साधला आहे.

खोटी कारवाई. खोटे पुरावे मी शिवसेना सोडणार नाही. मरेन पण शरण जाणार नाही, जय महाराष्ट्र अंस संजय राऊत यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तर कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे. बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय. मी शिवसेनेसाठी लढत राहीन. असे संजय राऊत हे आपल्या तिसऱ्या ट्विटमध्ये म्हणत आहेत.