माझ्याविरोधात काही घडले तर त्यावर हा मराठ्यांचा असे मी म्हणणे चुकीचे आहे – पवार

sharad pawar- सरकार विरोधकांकडे दुर्लक्ष करून कारभार करण्याचा प्रयत्न करत आहे. देशातील जनता सर्वकाही पाहत आहे. याची सरकारला जबरदस्त किंमत मोजावी लागेल असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार निलंबनाच्या मुद्यावरून केंद्रातील नरेंद्र मोदी (Sharad Pawar) सरकारवर हल्लाबोल केला आहे.

१३ डिसेंबर रोजी लोकसभेत दोन तरुणांनी घुसखोरी केली. त्यापाठोपाठ विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहात निवेदन करण्याची मागणी लावून धरली. सरकारला प्रश्न विचारत असल्याने विरोधी पक्षातील दोन्ही सभागृहामधील खासदारांना निलंबन करण्यात आलं आहे. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी दिल्लीत आज विरोधी पक्षांच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी शरद पवार उपस्थित होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार साहेब यांनी आपली भूमिका मांडली.

शरद पवार पुढे म्हणाले की, खासदारांची एकच मागणी होती की, ४-५ दिवसांपूर्वी संसदेत जे लोक संसदेत घुसले होते ते संसद सदस्य नव्हते. ते सभागृहात कसे आले? त्यांना पास कुणी दिला? यावर सभागृहात चर्चा होणे गरजेचे आहे. विरोधकांनी याविषयीची मागणी केली होती. सरकाने त्यावर स्पष्टीकरण देणे अपेक्षित होते. पण सरकारने कोणतेही उत्तर दिले नाही. उलट यासंबंधी चर्चेच्या मागणीचा आग्रह धरणाऱ्या खासदारांचे निलंबन केले. संसदेत असे यापूर्वी केव्हाच घडले नव्हते असेही शरद पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, विधेयकांवर चर्चा होणं हेच त्यांना आवडत नाही. कोणतंही विधेयक किंवा कायदा सभागृहासमोर येतो आणि विरोधकांना तुम्ही भूमिका मांडण्याची संधीच न देता ते पारित करणार असाल तर ते योग्य नाही. संसदीय लोकशाहीचा हा अपमान आहे. जे काही झालं ते संसदेच्या इतिहासात आजपर्यंत घडलं नाही. ते काम या सरकारनं केलं आहे. मला विश्वास आहे की देशातली जनता योग्य वेळी त्यांना धडा शिकवेल असेही शरद पवार साहेब म्हणाले. खासदारांचं निलंबन केलं ही काय चांगली गोष्ट आहे का? संवाद ठेवायला हवा. लोकशाहीत संवादाशिवाय सरकार चालत नाही असेही ते म्हणाले.

शरद पवार पुढे म्हणाले की, नक्कल करणारे सदस्य सभागृहात होते का? सभागृहाच्या बाहेर ते घडले. समजा मी इथे आत्ता काहीतरी केले, तर त्याची जबाबदारी माझ्या पक्षावर किंवा नेत्यावर असेल का? सभागृहाबाहेर कुणी काही केले तर त्यावर फारतर चर्चा होऊ शकते. पण हे प्रकरण इथपर्यंत घेऊन जाणे अयोग्य आहे. माझ्याविरोधात काही घडले तर त्यावर मी मराठा आहे, शेतकरी आहे. हा मराठ्यांचा, शेतकऱ्यांचा अपमान आहे असे मी म्हणणे चुकीचे आहे, असे शरद पवार उपराष्ट्रपतींच्या विधानावर नापसंती व्यक्त करताना म्हणाले आहे.

महत्वाच्या बातम्या-

जम्मू-काश्मीरमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला,4 जवान शहीद

कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा

डॉ. प्रभा अत्रे, डॉ. प्रमोद चौधरी यांना उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते मिळणार ‘अटल संस्कृती गौरव पुरस्कार’

“लोकशाही बसली धाब्यावर! हुकुमशाहीचा उदय की…”, संसदेतून १४१ खासदारांचं निलंब; तेजस्विनी पंडित संतापली