कर्ज वसुली करिता शेतकऱ्यांना पाठवण्यात येणारी बँकेची नोटीस तत्काळ थांबवा; राष्ट्रवादीची मागणी

मुंबई- राज्यात सरासरीपेक्षा यंदा पाऊस कमी पडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तर दुसरीकडे बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज वसुली करिता नोटीस बजावण्यात येत आहे. मात्र राज्यातील शिंदे फडणवीस सरकार मूग गिळून गप्प का बसलं आहे असा संतप्त सवाल महेश तपासे (Mahesh Tapase) मुख्य प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) यांनी आज राज्य शासनाला विचारला.

विद्यमान सरकार हे पूर्णपणे शेतकरी विरोधी आहे हे सुरुवातीपासूनच आम्ही जाणतो. आज राज्यामध्ये सरासरी पेक्षा कमी पाऊस पडल्यानंतर देखील बँका मोगलाई पद्धतीने कर्ज वसुलीच्या नोटिसा शेतकऱ्यांना पाठवत असताना विद्यमान सरकार कुठलीच कारवाई करत नाही ही खेदाची बाब आहे.

बँकेने पाठवलेला नोटीस तातडीने रद्द करण्याचे आदेश राज्य शासनाने द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महेश तपासे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना केली.

बँकेच्या नोटिसीमुळे शेतकऱ्यांना त्रास झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आक्रमक पावित्र स्वीकारेल अशी कबुली महेश तपासे यांनी यावेळी दिली.

महेश तपासे पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रात जुन, जुलै या महिन्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यातच या ऑगस्ट महिन्यात देखील सरासरीपेक्षा सुमारे ६८ टक्क्यांनी पाऊस कमी आहे. दि. १ ते १८ ऑगस्ट दरम्यान सर्वच विभागांत पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा ८० टक्क्यांनी कमी आहे. बहुतेक ठिकाणी पाऊस पडलेला नाही. हि परिस्थिती भीषण असून शेतकऱ्यांचे हातचे पीक निघून गेले आहे. हे पाहता या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणे आवश्यक आहे असेही तपासे म्हणाले.