कितीही विरोध झाला, तरी उद्धव ठाकरे दसरा मेळावा घेणार म्हणजे घेणारच : हेमंत देसाई

मुंबई- दसरा मेळाव्यावरुन ठाकरे आणि शिंदे गटात चढाओढ सुरू असल्याचे चित्र आहे. ठाकरे गटाला अद्याप दसरा मेळाव्यासाठी कोणतही मैदान मिळालेलं नाही, त्यामुळे राज्यातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे. याचदरम्यान जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे.

ते म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तित्वाचा प्रभाव आपल्यावर कसा पडला आहे, त्यांच्या विचारांचे संस्कार आपल्यावर कसे झाले आहेत, हे रोजच्या रोज सांगणार्‍या माननीय एकनाथ शिंदेंना बाळासाहेबांचा उमदेपणा आणि दिलदारपणा घ्यावा, असे का वाटत नाही? मूळ शिवसेनेला दसरा मेळावा घेता येऊ नये यासाठी प्रयत्न करणे, उद्धव ठाकरे ज्यावेळी सभा घेणार, तेव्हाच आपली पत्रकार परिषद आयोजित करण्याचे मीडियातून जाहीर करणे, या सगळ्यातून काय दिसते?असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

आजच्या सोशल मीडियाच्या जगात उद्धवजींचे वा अन्य कोणाचेही विचार दाबण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी ते पूर्णांशाने शक्य होणार नाही. तेव्हा एकनाथजी, तुम्ही सभा घ्या आणि उद्धवजींनाही घेऊ द्या. उद्धवजींना सभा घेता आली नाही, तर ते बाळासाहेबांना रुचले असते का? आणि कितीही विरोध झाला, तरी उद्धव ठाकरे दसरा मेळावा घेणार म्हणजे घेणारच, हे नक्की आहे! असं देसाई म्हणाले आहेत.