भामा आसखेड प्रकल्पातून वडगावशेरी हद्दीतील पाणी पुरवठा सुरळीत करा;डॉ. सिद्धार्थ धेंडे यांची मागणी  

पुणे / प्रतिनिधी- भामा आसखेड प्रकल्पातून (Bhama Askhed Project) वडगाव शेरी हद्दीतील पाणी पुरवठा सुरळीत करा, अशी मागणी पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केली आहे. पुणे महापालिका पाणीपुरवठा विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना डॉ. धेंडे यांनी निवेदन देऊन मागणी केली.

डॉ. धेंडे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, वडगावशेरी मतदार संघातील भामा आसखेडच्या माध्यमातून जो पाणी पुरवठा होत आहे. त्यामध्ये गेल्या वर्षभरात अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. परिसरातील नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे अपुरा पाणी पुरवठा होत आहे. चाकरमान्यांची, गृहिनींची गैरसोय होत आहे. भामा आसखेडच्या परिसरात सातत्याने वीज पुरवठा खंडीत होत आहे. परिणामी पाणीपुरवठा होत नाही. भामा आसखेडच्या लाईनवर सातत्याने गळती होत आहे. त्याची दुरुस्ती करण्यासाठी वेळ जात आहे. तोपर्यंत नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.

वरील सर्व बाबींमुळे या मतदार संघातील नागरीक हे पाण्यासारख्या मुलभूत गरजेपासून त्रासले आहेत. गेल्या आठवडयात गुरुवारी पाणी पुरवठा बंद होता. शुक्रवारी पूर्ण दिवसभर कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. शनिवारी दुपारपर्यंत पाण्याच्या लाईनच्या गळतीमुळे नागरीकांचे पाण्याविना अतोनात हाल झाले आहेत. त्यामुळे येणाऱ्या गुरुवारी (दि. 22) पुणे शहरात होणारा पाणी कपातीचा निर्णय भामा आसखेड परिसरात लागू नये.

भामा आसखेड प्रकल्पाच्या आधी लष्कर व होळकर या दोन जलशुध्दीकरण प्रकल्पातून या मतदारसंघाला पाणी पुरवठा होत होता. त्याची पर्यायी व्यवस्था आपत्कालीन स्थितीमध्येच चालू ठेवावी. तसेच एका अधिकाराऱ्यांची खास टीम या आपत्कालीन परिस्थिती करीता कार्यान्वित करावी. जेणेकरून येथील नागरीकांचे हाल होणार नाही. आपण या सूचनांचा सकारात्मक विचार करावा, अशी मागणी डॉ. धेंडे यांनी केली. या वेळी दिलेल्या निवेदनावर सकारात्मक मार्ग काढू असे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती डॉ. धेंडे यांनी दिली.